Join us

ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:58 IST

Microsoft To Cut Jobs: मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने या संदर्भात सांगितले की, कंपनी बाजारानुसार स्वतःला सुधारण्यासाठी सतत आवश्यक संस्थात्मक बदल करत असते.

Microsoft Layoffs : जगातील सर्वात प्रसिद्ध टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरकपातीचे सत्र थांबायचे नाव घेताना दिसत नाही. ज्या इंजिनिअर्सनी रात्रंदिवस कष्ट करुन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय विकसित केलं. तेच आता त्यांची नोकरी खात आहे. फक्त मायक्रोसॉफ्टच नाही तर गुगल, सॅमसंग सारख्या टेक कंपन्याही हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देत आहेत.

गेल्या महिन्यात तब्बल ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर, मायक्रोसॉफ्टने आता दुसऱ्या फेरीत ३०० हून अधिक लोकांना कामावरून काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनीचे काम अधिक सुरळीत चालवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट हे पाऊल उचलत आहे.

कोणत्या विभागांवर परिणाम होणार?आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कपातीनंतर, यावेळी नेमक्या कोणत्या विभागातून कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीच्या या निर्णयाचा कोणत्या विभागावर परिणाम होईल, याबाबतही सध्या माहिती उपलब्ध नाही. मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने या संदर्भात सांगितले की, कंपनी बाजारातील बदलांनुसार स्वतःला सुधारण्यासाठी आणि अधिक कार्यक्षम होण्यासाठी सतत आवश्यक संस्थात्मक बदल करत असते.

एआय खातोय कर्मचाऱ्यांची नोकऱ्या?एकीकडे मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कामगार संख्येत कपात करण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे ते एआयमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. कोडिंग आणि इतर तांत्रिक कामांमध्ये मायक्रोसॉफ्ट आता AI ची मदत मोठ्या प्रमाणावर घेत आहे.

वाचा - CA ला 'बाय बाय'! आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री!

जून २०२४ च्या आकडेवारीनुसार, या अमेरिकन टेक कंपनीत २,२८,८०० पूर्णवेळ कर्मचारी होते, त्यापैकी जवळजवळ निम्मे कर्मचारी अमेरिकेत काम करत होते. अशा परिस्थितीत, मायक्रोसॉफ्टकडून हे स्पष्ट संकेत मिळत आहे की, AI च्या या युगात, कंपनी आपले संपूर्ण लक्ष व्यवसायाच्या वाढीवर केंद्रित करत आहे. त्याचबरोबर, पारंपारिक मानवी भूमिकांपेक्षा तंत्रज्ञानावर, विशेषतः AI वर, अधिक अवलंबून राहणार आहे. यामुळे भविष्यात अशा नोकरकपातीचे सत्र आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :मायक्रोसॉफ्ट विंडोबिल गेटसआर्टिफिशिअल इंटेलिजन्सनोकरीमाहिती तंत्रज्ञान