पुणे - आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या एका कर्मचाऱ्याने थकीत पगाराची मागणी करत कंपनीच्या पुणे कार्यालयाबाहेर विरोध प्रदर्शन केले आहे. सौरभ मोरे या फुटपाथवर झोपलेल्या कर्मचाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोमध्ये मोरे त्याच्या बॅगेचा उशी म्हणून वापर करत फुटपाथवरच झोपला आहे. या फोटोत त्याच्या बाजूला एक लेटरही लिहिलेले दिसते. हा फोटो बराच व्हायरल झाल्यानंतर आता कंपनीकडून या प्रकारावर निवेदन जारी करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्याच्या पत्रात काय लिहिलंय?
मी २९ जुलैला सह्याद्री पार्क, पुणे येथील कंपनीच्या ऑफिसमध्ये रिपोर्ट केले होते, आजही माझा आयडी अल्टीमॅटिक्स आणि टीसीएसच्या सिस्टमवर एक्टिव्ह नाही. मला माझा पगार दिला जात नाही. ३० जुलैला एक बैठक झाली होती. त्यात ३१ जुलैला मला पगार मिळेल असं सांगितले गेले. मी एचआरला कळवले, माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे माझ्यावर TCS कंपनीच्या बाहेरील फुटपाथवरच झोपायची वेळ येईल. त्यानंतर एचआरने काहीच प्रतिसाद दिला नाही. केवळ गप्प राहिले. त्यामुळे २९ जुलैपासून मी टिसीएस कंपनीच्या समोरील फुटपाथवर राहत आहे असा उल्लेख त्याच्या पत्रात आहे.
या प्रकारावर फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजनेही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पुणे येथील टिसीएस कार्यालयाबाहेर थकीत वेतनासाठी बसलेल्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी आहोत. या बिकट परिस्थिती आवाज उचलण्यासाठी त्याने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. पगारात होणारा विलंब आणि नोकरी संबंधित मुद्द्यांसाठी औपचारिकपणे कामगार मंत्रालयाला सूचना द्यायला हवी. विरोध हा संदेश असतो, परंतु त्याला कायदेशीर तक्रारीची जोड मिळाल्यानंतर लढाई मजबूत होते आणि जबाबदारी निश्चित होते. कर्मचाऱ्याने कायदेशीर मदत घेण्यासाठी संकोच करू नये. त्यांचा अधिकार भारतीय कामगार कायद्यातंर्गत संरक्षित आहे असं फोरमने म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकारावर टिसीएस कंपनीनेही मौन सोडले आहे. कामावर कुठलीही सूचना न देता अनुपस्थित राहिल्याबद्दल मोरे यांचा पगार रोखण्यात आला होता. प्रक्रियेनुसार, गैरहजर राहिलेल्या काळातील सॅलरी देणे स्थगित केले होते. तो पुन्हा कामावर परतला आहे, आम्ही सध्या त्याला राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकरणी निष्पक्षपणे तोडगा काढून संबंधित कर्मचाऱ्याला मदत करण्यावर काम सुरू आहे असं कंपनीने सांगितले. तर सोशल मीडियात या प्रकारानंतर टाटा ग्रुपवर लोकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर टिसीएस मॅनेजमेंट नियंत्रणातून गेले आहे. कुठलीही नैतिकता शिल्लक नाही अशी नाराजी लोक व्यक्त करत आहेत. त्यातच अलीकडेच TCS कंपनीतून १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार असल्याची बातमी समोर आली होती.