Join us

टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:37 IST

Ratan Tata Upstox : रतन टाटा यांनी एका कंपनीतील गुंतवणूक कमी केली आहे. त्यांनी या स्टार्टअपमध्ये २०१६ मध्ये गुंतवणूक केली होती.

Ratan Tata Upstox : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी ब्रोकरेज प्लॅटफॉर्म अपस्टोक्समधील ०.०६ टक्के हिस्सा सुमारे २० लाख डॉलर (सुमारे १८ कोटी रुपये) मध्ये विकला आहे. कंपनीतील मूळ गुंतवणुकीवर त्यांना २३ हजार टक्के परतावा मिळालाय. २०२२ मध्ये कंपनीचे मूल्य ३.५ अब्ज डॉलर होतं. कंपनीनं गुरुवारी याबाबत माहिती दिली. टाटांनी आठ वर्षांपूर्वी अपस्टॉक्समध्ये गुंतवणूक केली होती. या शेअर विक्रीनंतर अपस्टॉक्समधील टाटांचा हिस्सा १.२७ टक्क्यांवर आला आहे. टाटा सन्स ही देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह असलेल्या टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे.

अनेक दशकं टाटा समूहाचं नेतृत्व केल्यानंतर ८० वर्षीय रतन टाटा यांनी एंजेल इनव्हेस्टर म्हणून शेकडो स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. आता त्यांचं मूल्यांकन वाढलं आहे. अपस्टॉक्सच्या आधी रतन टाटा यांनी आयपीओच्या माध्यमातून बेबी केअर प्लॅटफॉर्म फर्स्टक्रायचे काही शेअर्स विकले होते.

कधी खरेदी केलेला हिस्सा?

अपस्टॉक्समधील शेअरविक्री बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा ब्रोकरेज कंपनीतील सुरुवातीची गुंतवणूक काढून घ्यायची होती आणि त्यानंतर नफा कमवायचा होता. टाटांनी २०१६ मध्ये अपस्टॉक्समध्ये १.३३ टक्के हिस्सा खरेदी केला होता.

टॅग्स :रतन टाटागुंतवणूक