Tata Trustees : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी जगभर विस्तार केलेल्या टाटा समुहात सध्या वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. टाटा ट्रस्ट्सच्या एका बैठकीत मोठी खडाजंगी झाल्याची बातमी समोर आली आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित संचालक म्हणून पुन्हा नियुक्ती करण्याच्या मुद्द्यावरून हा वाद इतका वाढला की, अखेर विजय सिंह यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. ते ७७ वर्षांचे असून, २०१३ पासून टाटा सन्सच्या बोर्डवर ट्रस्ट्सचे प्रतिनिधित्व करत होते.
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट, या दोन प्रमुख ट्रस्टकडे टाटा सन्सची ६६% हिस्सेदारी आहे. टाटा सन्स २७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेला भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह आहे.
काय आहे प्रकरण?हा वाद ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला, जेव्हा रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांना ट्रस्ट्सचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यावेळी ट्रस्टींनी एक नियम मंजूर केला की, ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नामनिर्देशित संचालकांच्या नियुक्तीचा दरवर्षी आढावा घेतला जाईल. विजय सिंह, जे या नियमाच्या कक्षेत येत होते, त्यांच्या पुन्हा नियुक्तीला गुरुवारच्या बैठकीत चार विश्वस्तांनी विरोध केला. मेहली मिस्त्री, प्रमीत झवेरी, जहांगीर जहांगीर आणि डेरियस खंबाटा यांनी त्यांचा विरोध दर्शवला. दुसरीकडे, नोएल टाटा आणि वेणु श्रीनिवासन, जे टाटा सन्सच्या बोर्डवर ट्रस्ट्सचे इतर दोन नामनिर्देशित संचालक आहेत, त्यांनी या नियुक्तीवर टाटांच्या परंपरेनुसार योग्य प्रक्रियेचा आग्रह धरला.
सध्या दोनच संचालक शिल्लकविजय सिंह स्वतः बैठकीला उपस्थित नव्हते, कारण हा मुद्दा त्यांच्या नियुक्तीशी संबंधित होता. या चार विश्वस्तांनी मेहली मिस्त्री यांना बोर्डमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण नोएल आणि वेणु यांनी याला विरोध केला. त्यांचा असा युक्तिवाद होता की, कोणताही निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतला जावा. काही सूत्रांनुसार, हा ट्रस्ट्सवर आणि नंतर टाटा सन्सवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होता.
सध्या टाटा सन्सच्या संचालक मंडळात फक्त दोन नामनिर्देशित संचालक उरले आहेत, तर नियमांनुसार ट्रस्ट्स एकूण संचालकांच्या एक-तृतीयांश संचालकांना नामनिर्देशित करू शकतात. आता ट्रस्ट्स लवकरच एका प्रोफेशनल सर्च फर्मला बोलावून नवीन उमेदवारांची यादी तयार करण्याची शक्यता आहे.
माहितीची दरी आणि इतर मुद्देटाटा सन्सच्या बोर्डमध्ये असलेले विश्वस्त आणि इतर विश्वस्त यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यावरूनही तणाव आहे. जे विश्वस्त बोर्डवर नाहीत, त्यांना वाटते की त्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही. तर, बोर्डवरील विश्वस्तांचे म्हणणे आहे की, टाटा सन्स सारख्या मोठ्या कंपनीतील गोपनीय माहितीची जबाबदारी असल्याने ते फक्त आवश्यक माहितीच शेअर करू शकतात. काही विश्वस्तांना असेही वाटते की, नामनिर्देशित संचालक म्हणून काम करणाऱ्यांनी टाटा सन्सकडून संचालक शुल्क घेणे योग्य नाही, कारण त्यांचे काम ट्रस्ट्सच्या वतीने देखरेख करणे आहे.
वाचा - संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद चिघळला; करिश्मा कपूरने व्हॉट्सॲप चॅट केले उघड
विजय सिंह यांच्या राजीनाम्याव्यतिरिक्त, राल्फ स्पेथ, अजय पिरामल आणि लिओ पुरी यांच्या राजीनाम्यामुळे टाटा सन्सच्या बोर्डवर आणखी काही जागा रिक्त झाल्या आहेत. आता हा वाद कसा मिटतो आणि टाटांच्या वारसा पुढे कसा नेला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.