Join us
Daily Top 2Weekly Top 5

टाटा सन्सच्या बोर्डात मतभेद? एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीचा निर्णय लांबणीवर, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 17:45 IST

Tata Group N. Chandrasekaran : टाटा सन्सने अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. नवीन व्यवसायांमधील तोट्यांवरून संचालक मंडळाच्या बैठकीत मतभेद उघड झाले.

Tata Group N. Chandrasekaran : देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह असलेल्या 'टाटा समूहा'ची धुरा सांभाळणाऱ्या टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळ विस्ताराबाबतचा निर्णय सध्या टाळण्यात आला आहे. बोर्डाच्या बैठकीत नवीन प्रकल्पांमधील वाढत्या तोट्यावरून काही वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद समोर आल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चंद्रशेखरन यांचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार आहे.

नोएल टाटा आणि चंद्रशेखरन यांच्यात 'तोट्या'वरून चर्चा?मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा सन्सच्या बोर्ड बैठकीत चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या कार्यकाळावर चर्चा होणार होती. मात्र, खुद्द चंद्रशेखरन यांनीच ही चर्चा तूर्तास थांबवण्याची विनंती केली. टाटा ट्रस्ट्सचे चेअरमन नोएल टाटा यांनी समूहाच्या काही नवीन प्रकल्पांमध्ये होत असलेल्या वाढत्या तोट्याचा मुद्दा उपस्थित केला. काही संचालकांच्या मते, नवीन प्रकल्पांमध्ये सुरुवातीच्या काळात तोटा होणे स्वाभाविक असून, त्याकडे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. मात्र, या मतभेदामुळे तूर्तास निर्णयावर शिक्कामोर्तब झाले नाही.

चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वात समूहाची भरभराट२०१७ मध्ये सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाची कमान हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात समूहाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. गेल्या पाच वर्षांत समूहाचा महसूल जवळपास दुप्पट झाला आहे. समूहाचा निव्वळ नफा आणि बाजार भांडवल तीन पटीने वाढले आहे. समूहाने 'फ्युचर फिट' धोरणांतर्गत ५.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

वाचा - तुमचा एक 'क्लिक' आणि लाखो लिटर पाणी फस्त! दररोज ६,००,००० घरांची वीज वापरणार, डेटा सेंटर्सची 'महाभूक'

टाटा सन्सचा आर्थिक अहवाल२०२४-२५ या आर्थिक वर्षात टाटा सन्सचा महसूल २४% वाढून ५.९२ लाख कोटी झाला असला, तरी निव्वळ नफा १७% ने घटून २८,८९८ कोटी रुपयांवर आला आहे. जागतिक व्यापार धोरणातील अनिश्चिततेचा फटका बसल्याचे कंपनीने म्हटले आहे. चेअरमनच्या कार्यकाळाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने 'टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन'च्या शेअर्समध्ये २.९४% ची घसरण झाली आणि शेअर ६६८ रुपयांवर स्थिरावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Sons Board Disagreement Delays N. Chandrasekaran's Reappointment

Web Summary : Tata Sons delays N. Chandrasekaran's reappointment amid board disagreements over losses. Noel Tata questioned new project losses, causing debate. Despite Chandrasekaran's leadership doubling revenue, profit fell 17%. Uncertainty impacted Tata Investment Corporation shares.
टॅग्स :टाटानोएल टाटाव्यवसायसेबी