भारतातील सर्वात मोठी आयटी सर्व्हिस कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि सर्व्हिस ट्रान्सफॉर्मेशन युनिट स्थापन केले आहे. अमित कपूर, हे मुख्य एआय आणि सर्व्हिस ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर म्हणून हीचे नेतृत्व करतील. सध्या कपूर इंग्लंड आणि आयर्लंडमधील टीसीएसच्या व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत. त्यांची जबाबदारी आता विनय सिंघवी यांच्याकडे सोपवली जाईल. टीसीएसचे सीईओ के. कृतिवासन यांनी अंतर्गत मेमोमध्ये विनय सिंघवी यांची इंग्लंड आणि आयर्लंड बाजाराचे प्रमुख म्हणून, नियुक्ती जाहीर केली. नवीन एआय युनिट आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील सर्व टीम आणि क्षमतांचे एकत्रिकरण करेल.
टीसीएसच्या नफ्यात वाढ -चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत टीसीएसचा नफा सहा टक्क्यांनी वाढून 12,760 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत टीसीएसचा महसूल 1.3 टक्क्यांनी वाढून 63,437 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, स्थिर चलन आधारावर कंपनीचा महसूल तीन टक्क्यांहून अधिक घटला आहे. खरे तर, बीएसएनएल करार संपल्यानंतर, कंपनीला आपल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आव्हानांचा सामना करावा लागला.
जून तिमाहीत कंपनीचे इतर उत्पन्न वाढून 1,660 कोटी रुपये झाले. जे गेल्या वर्षाच्या समान कालावधीत 962 कोटी रुपये होते. दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांना प्रति शेअर ११ रुपये अंतरिम लाभांश देण्याची शिफारसही केली आहे.
तिमाही निकालांदरम्यान, टीसीएसच्या नवनियुक्त सीओओ आरती सुब्रमण्यम म्हणाल्या, आर्टिफिशियल इंटेलिजेंसशी (एआय) संबंधित ऑफरिंगमध्ये लोकांचा रस दिसत आहे. मात्र, त्यांनी महसूल बुकिंग संदर्भात भाष्य करण्यास नकार दिला.
कंपनीत किती कर्मचारी? - जून तिमाहीच्या अखेरीस टीसीएसच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६,१३,०६९ होती, जी जून २०२४ पेक्षा ६,००० आणि मार्च तिमाहीपेक्षा ५,००० ने अधिक आहे. तथापि, गेल्या तिमाहीत नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण १३.८ टक्क्यांपर्यंत वाढले.