Tata Motors Ltd Share: टाटा मोटर्स लिमिटेडचे शेअर्स आज व्यवहारादरम्यान चर्चेत आहेत. कामकाजादरम्यान टाटा समूहाच्या या शेअरमध्ये ९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचा शेअर ६८४.२५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला. ही त्याची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत आहे. शेअर्सच्या या घसरणीमागील कारण म्हणजे डिसेंबर तिमाहीचे खराब निकाल. डिसेंबर तिमाहीच्या निगेटिव्ह रिपोर्टनंतर ब्रोकरेज फर्मनंही टार्गेट प्राइस कमी केली असून रेटिंगही कमी करण्यात आलं आहे. बुधवारी निकाल जाहीर होण्यापूर्वी टाटा मोटर्सचा शेअर ३.६ टक्क्यांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी ७५४.६५ रुपयांवर बंद झाला होता.
ब्रोकरेजचं मत काय?
जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजनं टाटा मोटर्स लिमिटेडचं शेअरवरील रेटिंग आधीच्या 'बाय' रेटिंगवरून 'अंडरपरफॉर्म' केलंय आणि तसंच टार्गेट प्राइस पूर्वीच्या ९३० रुपयांवरून ६६० रुपयांवर आणली आहे. जेएलआरला चीन आणि युरोपमध्ये कमकुवत मागणी, तसंच कन्झ्युमर अॅक्वेझेशन कॉस्ट आणि उच्च वॉरंटी खर्चाचा सामना करावा लागत असल्यानं जेफरीजनं टाटा मोटर्सचे रेटिंग कमी केलंय.
जागतिक ब्रोकरेज फर्म यूबीएसने टाटा मोटर्सवर 'सेल' रेटिंग दिलं असून टार्गेट प्राइस ७६० रुपये केली आहे. तर मॉर्गन स्टॅनलीनं ८५३ रुपयांच्या टार्गेट प्राइससह शेअरवर 'इक्वलवेट' रेटिंग कायम ठेवले आहे. तथापि, सीएलएसएनं ९३० रुपयांच्या टार्गेट प्राईससह शेअरवर आपलं 'आउटपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवलंय.
नफ्यात २२ टक्क्यांनी घट
टाटा मोटर्सचा निव्वळ नफा ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरून ५,५७८ कोटी रुपयांवर आलाय. टाटा मोटर्सनं बुधवारी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तिमाहीचे निकाल शेअर बाजारात जाहीर केले. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ७,१४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे कामकाजातून मिळणारं उत्पन्न १,१३,५७५ कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १,१०,५७७ कोटी रुपये होतं. गेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च १,०७,६२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १,०४,४९४ कोटी रुपये होता.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)