Join us

सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:30 IST

TATA Motors Big Deal: देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणं, टाटा ग्रुप, एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. पाहा काय करण्याच्या तयारीत आहे टाटा.

Tata Motors-Iveco Deal: देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणं, टाटा ग्रुप, एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाची ऑटो कंपनी टाटा मोटर्स इटालियन ट्रक उत्पादक कंपनी इव्हेको (Iveco) खरेदी करण्याच्या विचारात आहे. हा करार ४.५ अब्ज डॉलर्सचा असू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूहाची ही आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी खरेदी असेल. यापूर्वी टाटा ग्रुपची कंपनी टाटा स्टीलनं २००७ मध्ये कोरस खरेदी केली होती. हा करार १२ अब्ज डॉलर्समध्ये झाला होता. ऑटोमोबाईल क्षेत्रातील टाटा मोटर्सचा हा सर्वात मोठा करार असेल. २००८ मध्ये, टाटा मोटर्सनं जग्वार लँड रोव्हर (JLR) २.३ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिग्रहणाची औपचारिक घोषणा लवकरच होऊ शकते. टाटा मोटर्स आणि इव्हेकोचे संचालक मंडळ या कराराला मंजुरी देण्यासाठी बैठक घेणार आहेत. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. इव्हेकोचे मुख्यालय इटलीतील ट्यूरिन येथे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स एक्सॉरकडून २७.१% हिस्सा खरेदी करेल. एक्सॉर ही अ‍ॅग्नेली कुटुंबाची इनव्हेस्टमेंट कंपनी आहे. त्यानंतर टाटा मोटर्स इतर लहान भागधारकांना खरेदी करण्यासाठी टेंडर ऑफर (ओपन ऑफर) सुरू करेल. एक्सॉरकडे इव्हेकोच्या ४३.१% मतदानाचे अधिकार आहेत.

Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा

टाटा समुहाचा फायदा काय?

इव्हेको त्यांचा संरक्षण व्यवसाय वेगळा करत आहे. हा टाटा मोटर्सच्या कराराचा भाग असणार नाही. टाटा ग्रुपला ते इव्हेकोचे १००% अधिग्रहण करतील याची खात्री आहे. मंगळवारी या कराराच्या अपेक्षेनं इव्हेकोचे शेअर्स ७.४% पर्यंत वाढले. या वर्षी कंपनीचा स्टॉक दुप्पट झाला आहे, ज्यामुळे कंपनीचे मूल्यांकन ६.१५ अब्ज डॉलर्स झालंय. एक्सॉर आणि इव्हेकोचे संचालक मंडळ टाटाला विक्री करण्याच्या बाजूनं असल्याचे मानलं जातंय. याचं कारण म्हणजे अ‍ॅग्नेलिस समूह टाटा समुहाच्या जवळचा मानला जातो.

युरोपमधील परिस्थिती

व्होल्वो, डेमलर आणि ट्रॅटन यांच्या वर्चस्वाखालील बाजारपेठेत इव्हेको ही सर्वात लहान युरोपियन ट्रक उत्पादक कंपनी आहे. परंतु संवेदनशील संरक्षण व्यवसायामुळे ते इटालियन सरकारसाठी एक धोरणात्मक ऑपरेशन बनलंय. २०२१ मध्ये, चिनी कंपनी FAW ने ते खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण इटालियन सरकारनं ते थांबवले. त्यावेळी अ‍ॅग्नेलिस त्यांच्या औद्योगिक गट सीएनएच इंडस्ट्रियलद्वारे इव्हेकोवर नियंत्रण ठेवत होतं. नंतर ते वेगळं करण्यात आलं आणि २०२२ च्या सुरुवातीला स्वतंत्रपणे लिस्ट करण्यात आलं. परंतु आता हा करार झाला, तर टाटा मोटर्सचे व्यावसायिक वाहन उत्पन्न ७५,००० कोटी रुपयांवरून तिप्पट होऊन २ लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतं.

टॅग्स :टाटाव्यवसायइटलीशेअर बाजारशेअर बाजार