Join us

TATA NINL: २ वर्षांपासून बंद होती कंपनी; टाटांकडे जाताच नशीब पालटलं! शेअर्स मोठ्या प्रमाणात वधारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 12:07 IST

अधिग्रहण केल्यानंतर ९० दिवसांत टाटा ग्रुपने ही कंपनी पुन्हा कार्यान्वित केली आहे.

TATA NINL: भारतातील एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून TATA ग्रुपकडे पाहिले जाते. टाटा समूहाचा प्रचंड मोठा व्याप असून, तो अनेक देशात पसरलेला आहे. ऑटोमोबाइलपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत अनेकविध क्षेत्रात टाटा समूहाच्या विविध कंपन्या कार्यरत आहेत. टाटा ग्रुपने आतापर्यंत अनेक कंपन्यांचे अधिग्रहण केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांना नवसंजीवनी दिली आहे. यात आणखी एका कंपनीची भर पडली आहे. गेले जवळपास २ वर्षे बंद असलेली कंपनी टाटाने घेतली आणि ती आता कार्यरत होत आहे. 

टाटा समूहाच्या हाती विक्री झाल्यानंतर २०२० मध्ये म्हणजेच जवळपास दोन वर्षांपासून बंद असलेल्या नीलाचल इस्पात निगम लिमिटेड या सरकारी कंपनीमध्ये कामकाज पुन्हा सुरु झाले आहे. टाटा समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, ओडिशा-आधारित नीलाचल इस्पात निगम लिमिटेडने टाटा स्टीलच्या उपकंपनीने १२ हजार कोटी रुपयांत संपादन केल्यानंतर जवळपास ९० दिवसांनी कामकाज सुरू केले आहे. नीलाचल इस्पात निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी टाटा स्टीलने तिच्या उपकंपनी टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्समार्फत अलीकडेच विकत घेतली. या वर्षी जानेवारीमध्ये १२ हजार कोटी रुपयांमध्ये हा करार झाला होता.

पुढील १२ महिन्यांत स्थापित क्षमता गाठेल

ही कंपनी ३० मार्च २०२० पासून बंद आहे. कंपनीच्या अधिग्रहणाच्या वेळी टाटांनी ऑक्टोबरमध्ये आपले कामकाज सुरू करेल असे सांगण्यात आले. कंपनी पुढील १२ महिन्यांत स्थापित क्षमता गाठेल अशी अपेक्षा आहे. टाटा स्टील देखील NINL ची क्षमता पाच दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी पावले उचलत आहे. नीलाचल इस्पात निगम लिमिटेड हे टाटा स्टीलने त्यांच्या उपकंपनी टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स द्वारे विकत घेतले आहे. NINL च्या कामकाजाच्या बातम्यांनंतर टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यापारात दोन टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे. हा शेअर २ रुपयांपेक्षा जास्त वाढून १००.५० रुपयांवर पोहोचला आहे.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांबद्दल बोलायचे झाले तर शेअरमध्ये ३.६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता येत्या काही दिवसांत तो १३० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. वार्षिक दहा दशलक्ष टन क्षमतेच्या ओडिशा-आधारित स्टील प्लांटचे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर, टाटा स्टीलने म्हटले आहे की २०३० पर्यंत NINL ची क्षमता वार्षिक १० दशलक्ष टनांपर्यंत वाढवायची आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :टाटा