Join us

TATA चे पाऊल पडते पुढे! Air India-विस्तारा विलिनीकरणाला मंजुरी; सर्वांत मोठी कंपनी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 15:57 IST

Tata Air India And Vistara Merger: या विलिनीकरणानंतर टाटा एअर इंडिया देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी ठरेल, असे सांगितले जात आहे.

Tata Air India And Vistara Merger: टाटा समूहाने केंद्र सरकारकडून एअर इंडियाची खरेदी केल्यानंतर अनेकविध बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रवाशांच्या सुविधेवर भर देण्यात आला आहे. अनेक धोरणात्मक पावले उचलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. टाटा समूहाने एअर इंडियाचा नवा लोगो अलीकडेच लाँच केला आहे. यातच टाटा समूहासाठी एक आनंदाची बातमी असून, एअर इंडिया आणि विस्तारा या दोन विमान कंपन्यांच्या विलिनीकरणाला सीसीआयने मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणासाठी टाटा समूह प्रयत्नशील होता. 

टाटा समूह एअर इंडिया आणि विस्तारा यांचे विलीनीकरण करणार आहे. यामुळे विमान कंपनीच्या ऑपरेशनची कार्यक्षमता वाढेल. टाटा समूहाने यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विस्तारा आणि एअर इंडियाच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला सीसीआयने मंजुरी दिली आहे. मात्र, त्यात काही अटी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

SIA एअरलाइन्सचे एअर इंडियात विलीनीकरण करण्यास मान्यता 

CCI ने टाटा SIA एअरलाइन्सचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. हे सिंगापूर एअरलाइन्सद्वारे एअर इंडियामधील काही शेअर्सच्या संपादनाच्या मंजुरीच्या आणि प्रस्तावित केलेल्या ऐच्छिक वचनबद्धतेच्या अधीन आहे. विस्तारा आणि एअर इंडिया या विमान कंपन्या टाटा समूहाच्या अंतर्गत येतात. विस्तारा एअरलाइन ही टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. विस्तारामध्ये सिंगापूर एअरलाइन्सची ४९ टक्के हिस्सेदारी आहे. टाटा समूहाने यंदाच्या एप्रिलमध्ये सीसीआयकडे विलिनीकरणाचा प्रस्ताव सादर केला होता. जूनमध्ये सीसीआयने प्रस्तावित विलीनीकरणासाठी अधिक तपशील मागितला होता. 

देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय विमान कंपनी बनणार

एअर इंडिया आणि विस्तार विलीनीकरणानंतर एअर इंडिया देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय आणि दुसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत विमान कंपनी बनेल. या विलीनीकरणात सिंगापूर एअरलाइन्सला अतिरिक्त शेअर्स दिले जातील. याबरोबरच एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्ट (एअर एशिया इंडिया) यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

 

टॅग्स :टाटाएअर इंडिया