Join us

Tata Capital चा आयपीओ लवकरच येणार; संचालक मंडळाची मंजुरी, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:48 IST

टाटा समूहाची टाटा कॅपिटल (Tata Capital) शेअर मार्केटमध्ये (Share Market) लिस्टिंगच्या आणखी एक पाऊल पुढे आली आहे. पाहा काय आहे अधिक माहिती.

टाटा समूहाची टाटा कॅपिटल (Tata Capital) शेअर मार्केटमध्ये (Share Market) लिस्टिंगच्या आणखी एक पाऊल पुढे आली आहे. कंपनीनं मंगळवारी आपल्या प्राथमिक सार्वजनिक विक्री (IPO) योजनेला मंजुरी दिली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टाटा कॅपिटल २३ कोटी नवे शेअर्स जारी करेल, तर काही विद्यमान भागधारक ऑफर फॉर सेल (OFS) मार्गानं बाहेर पडतील. टाटा समूहाच्या कंपनीनं काही बँकर्सशी चर्चा केल्यानंतर डिसेंबरमध्ये आयपीओची तयारी सुरू केली होती. कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर समूहाने प्रक्रिया सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला होता.

टाटा सन्सचा ९३ टक्के हिस्सा

टाटा कॅपिटलमध्ये टाटा सन्सचा ९३ टक्के हिस्सा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या यशस्वी लिस्टिंगनंतर टाटा समूहाचा हा दोन दशकांतील दुसरा आयपीओ असेल.

टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स आणि टाटा क्लीनटेक कॅपिटल या समूहाच्या तीन कर्ज देणाऱ्या व्यवसायांसाठी तसंच टाटा सिक्युरिटीज, टाटा कॅपिटल सिंगापूर आणि त्याच्या प्रायव्हेट इक्विटी डिव्हिजन या तीन गुंतवणूक आणि सल्लागार व्यवसायांसाठी टाटा कॅपिटल होल्डिंग कंपनी म्हणून काम करते.

टाटा समूहासाठी टाटा कॅपिटलला धोरणात्मक महत्त्व आहे. ते समूहातील विविध संस्थांच्या आर्थिक गरजा पूर्ण करते. हा समूह एक वित्तीय सेवा कंपनी आहे जी व्यक्ती, व्यवसाय आणि संस्थांना वैयक्तिक कर्ज, मालमत्तेवरील कर्ज, क्रेडिट कार्ड, गुंतवणूक बँकिंग आणि जीवन विमा यासारख्या विविध उत्पादनं आणि सेवा प्रदान करते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगटाटा