Join us

टाटा व वाडिया यांनी वाद आपापसात मिटवावेत; सरन्यायाधीश बोबडे यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 07:28 IST

प्रख्यात उद्योगपती नस्ली वाडिया यांनी रतन टाटा यांच्याविरुद्ध दाखल केलेला तब्बल ३००० कोटी रुपयांचा मानहानी दावा आपापसात मिटवावा,

नवी दिल्ली : प्रख्यात उद्योगपती नस्ली वाडिया यांनी रतन टाटा यांच्याविरुद्ध दाखल केलेला तब्बल ३००० कोटी रुपयांचा मानहानी दावा आपापसात मिटवावा, अशी सूचना भारताचे सरन्यायमूर्ती शरद बोबडे यांनी केली. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्या. शरद बोबडे रतन टाटा व नस्ली वाडिया यांना उद्देशून म्हणाले की, आपण दोघेही मुरब्बी उद्योगपती आहात आणि आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहात, हा विवाद आपण आपसात चर्चा करून का सोडवत नाही?यानंतर न्या. बोबडे यांनी हा विवाद संपवण्यासाठी उच्चपदस्थ मध्यस्थाची व्यवस्था करण्याची तयारीही दर्शविली व सूचनेवर विचार करण्यासाठी पुढील सोमवारपर्यंत दोन्ही पक्षांना वेळ दिला आहे. सप्टेंबर २०१६मध्ये टाटा सन्सचे मानद अध्यक्ष असलेल्या रतन टाटा यांनी कार्यकारी अध्यक्ष असलेल्या सायरस मिस्त्री यांना संचालक मंडळातून दूर केले होते. त्यावेळी नस्ली वाडिया यांनी सायरस मिस्त्री यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे डिसेंबर २०१६ मध्ये टाटा यांनी वाडिया यांना टाटा केमिकल्स, टाटा स्टील व टाटा मोटर्स या तिन्ही कंपन्यांच्या संचालक पदावरून दूर केले होते.रतन टाटा यांच्या या निर्णयामुळे आपली मानहानी झाली, त्याबद्दल ३००० कोटींचा मानहानी दावा वाडिया यांनी केला होता. दोन्ही दिग्गज उद्योगपती आता काय पवित्रा घेतात याकडे कंपनी जगताचे लक्ष आहे. सायरस मिस्त्री यांंच्याबाबत राष्ट्रीय कंपनी लवादाने दिलेल्या निकालासही टाटा सन्सने आव्हान दिले आहे.

टॅग्स :रतन टाटा