Join us

वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानींना धक्का! महत्त्वाचा प्रकल्प हातातून गेला; या राज्याकडून निविदा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:56 IST

Adani Energy Solutions : वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना धक्का बसला आहे. स्मार्ट मीटर बसवण्याचे ग्लोबल टेंडर रद्द करण्यात आले आहे.

Adani Energy Solutions : सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असणारे उद्योगपती गौतम अदानी यांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडूच्या द्रमुक सरकारने राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचे ग्लोबल टेंडर रद्द केले आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्सने या प्रकल्पासाठी जारी केलेल्या निविदेत सर्वात कमी किमतीची बोली लावली होती. त्यानंतर तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशनने ही निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

द्रमुक सरकारने निविदा का रद्द केली?इंडियम एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, अदानी एनर्जी सोल्युशन्सने खूप जास्त किंमत सांगितल्याचे कारण देत तामिळनाडू जनरेशन आणि वितरण महामंडळाने निविदा रद्द केली. अदानी एनर्जी सोल्युशन्स चेन्नई, कांचीपुरम आणि चेंगलपट्टूसह चार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या चारपैकी पॅकेज I मध्ये सर्वात कमी बोली लावणाऱ्यांमध्ये होती. या प्रकल्पासाठी अदानी एनर्जी सोल्युशन्सने लावलेली बोली राज्य सरकारला मान्य नसल्याने निविदा रद्द केल्याचे तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन अधिकाऱ्यांनी सांगितले. खर्च कमी करण्यासाठी यापूर्वीच कंपनीशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या नवीन वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत स्मार्ट मीटर देण्यासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये चार पॅकेजेसच्या स्वरूपात निविदा जारी करण्यात आल्या होत्या. एका सूत्राने सांगितले की, अदानींच्या कंपनीने चेन्नईसह ८ जिल्ह्यांना 'कव्हर' केलेल्या निविदांच्या पॅकेज-1 साठी सर्वात कमी बोली लावली होती. यामध्ये 82 लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसविण्याचा समावेश आहे. ही निविदा 27 डिसेंबर 2024 रोजी रद्द करण्यात आली.

अदानी यांच्यावर आरोपगौतम अदानी वादात सापडले असताना तामिळनाडू सरकारने हे पाऊल उचलले आहे. सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना 150 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 2100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात अमेरिकन वकिलांनी अदानी आणि समूहाच्या इतर काही अधिकाऱ्यांवर हा आरोप केला आहे. मात्र कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :गौतम अदानीअदानीतामिळनाडू