Join us

घ्या सोने अन् द्या कर्ज; थकबाकीदारही वाढले... सात महिन्यात सोनेतारण कर्ज घेणारे ५०.४ टक्के वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 07:10 IST

मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत हीच थकबाकी १,०२,५६२ कोटी रुपये इतकी होती. वार्षिक आधारे या थकबाकीमध्ये ५०.४ टक्के इतकी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : अलिकडच्या काळात सोने गहाण ठेवण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात बँकांमध्ये सोने-दागदागिन्याच्या बदल्यात घेतल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रमाण ५०.४ टक्के वाढले आहे.

 सोनेतारण कर्जाची प्रक्रिया सुलभ असते तसेच त्यावरील व्याजही तुलनेत कमी असल्याने कर्जदार हा पर्याय निवडत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी बँकांच्या क्षेत्रनिहाय कर्जवितरणाची आकडेवारी जाहीर केली. यातून दिसून आले की, १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सोन्यावरील कर्जाची थकबाकी १,५४,२८२ कोटी रुपये इतकी आहे. मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत हीच थकबाकी १,०२,५६२ कोटी रुपये इतकी होती. वार्षिक आधारे या थकबाकीमध्ये ५०.४ टक्के इतकी वाढ झाली आहे.

यामागे नेमकी कारणे काय?

आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते बिगर बँक वित्तीय संस्थांनी असुरक्षित कर्जापेक्षा सोन्यावरील सुरक्षित कर्जाचे धोरण स्वीकारले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत या संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये ०.७ टक्के घट झाली आहे.

मागील काही दिवसात सोन्याच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. यामुळे ग्राहकांनाही अधिक कर्ज सहजपणे मिळण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळेही सोनेतारण कर्जाचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इतर कर्जे किती?

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत होम लोनचे प्रमाण वाढून २८.७ लाख कोटींवर पोहोचले आहे. २०२३ च्या तुलनेत यात ३६.६ टक्के वाढ झाली आहे.

याच कालावधीमध्ये क्रेडिट कार्डावरील थकबाकी २.८१ लाख कोटींवर पोहोचली आहे. यात वार्षिक आधारे ९.२ टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :सोनंचांदी