Join us

IPO च्या किंमतीच्याही खाली आले Swiggy चे शेअर्स, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:59 IST

Swiggy Share Price : फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या शेअरमध्येही मंगळवारी घसरण झाली. सोमवारी स्विगीचे शेअर्स ९ टक्के आणि गेल्या शुक्रवारी २ टक्क्यांहून अधिक घसरले.

Swiggy Share Price : फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या शेअरमध्येही मंगळवारी घसरण झाली. मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारात कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी घसरून ३८९.२५ रुपयांवर आला. सोमवारी स्विगीचे शेअर्स ९ टक्के आणि गेल्या शुक्रवारी २ टक्क्यांहून अधिक घसरले. मंगळवारी झालेल्या घसरणीमुळे स्विगीचे शेअर्स आयपीओच्या किमतीच्या खाली पोहोचले आहेत. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ३९० रुपये होती. गेल्या ६ पैकी ५ ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्के घसरण झाली.

उच्चांकी पातळीहून ३५ टक्क्यांची घसरण

स्विगीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून ३५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. फूड डिलिव्हरी कंपनीचा शेअर २३ डिसेंबर २०२४ रोजी ६१७ रुपयांवर पोहोचला होता. २८ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर ३८९.२५ रुपयांवर आला. मात्र, मंगळवार २८ जानेवारी रोजी व्यवहाराअंती स्विगीच्या शेअर्समध्ये चांगली सुधारणा दिसून आली. झोमॅटोचे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यापासून स्विगीच्या शेअरवर दबाव आहे. स्विगीनं डिसेंबर २०२४ तिमाहीचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत.

काय म्हणाले एक्सपर्ट?

स्विगीचा समावेश असलेल्या १५ विश्लेषकांपैकी १० विश्लेषकांनी कंपनीच्या शेअरला 'बाय' रेटिंग दिले आहे. म्हणजेच १० विश्लेषकांनी स्विगीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. तर २ विश्लेषकांनी कंपनीच्या शेअर्सना होल्ड रेटिंग दिलंय. तर, ३ जणांनी कंपनीच्या शेअर्सना रेल रेटिंग दिले आहे. सीएनबीसी-टीव्ही १८ नं दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. 

स्विगीचा आयपीओ ६ नोव्हेंबर २०२४ रोजी गुंतवणूकीसाठी खुला होता आणि ८ नोव्हेंबरपर्यंत खुला होता. कंपनीचा आयपीओ एकूण ३.५९ पट सब्सक्राइब झाला. कंपनीचा शेअर १३ नोव्हेंबर २०२४ रोजी बीएसईवर ४१२ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा शेअर ४५५.९५ रुपयांवर बंद झाला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :स्विगीशेअर बाजारगुंतवणूक