Join us

सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:56 IST

Suzlon energy share price: सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर, शुक्रवारी तो १.८% च्या घसरणीसह ₹६५.०९ वर बंद झाला. वर्षभर हा शेअर स्थिर राहिला आहे.

Suzlon energy share price: मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडनं ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी सुझलॉन एनर्जीमध्ये गुंतवणूक केली आहे. जर आपण शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहिला तर, जून तिमाहीच्या अखेरीस सुझलॉन एनर्जी लिमिटेडमध्ये त्यांचा एक टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. जून तिमाहीत सुझलॉन एनर्जीमध्ये मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडचा १.०३% हिस्सा होता. मार्च तिमाहीच्या अखेरीस या फंडाचा कंपनीत कोणताही हिस्सा नव्हता. यामुळे, म्युच्युअल फंडांकडे आता सुझलॉन एनर्जीमध्ये ५.२४% हिस्सा आहे, तर मार्च तिमाहीत त्यांचा हिस्सा ४.१७% होता.

प्रमोटर, रिटेलचा हिस्सा किती?

सुझलॉन एनर्जीच्या प्रवर्तकांनी या तिमाहीत ब्लॉक डीलचा भाग म्हणून काही हिस्सा विकला, ज्यामुळे त्यांचा हिस्सा पूर्वीच्या १३.२५% वरून ११.७४% पर्यंत कमी झाला. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय जीवन विमा महामंडळानं (LIC) देखील जूनच्या अखेरीस कंपनीतील आपला हिस्सा १% पेक्षा थोडा जास्त ठेवलाय. दरम्यान, सुझलॉन एनर्जीमध्ये भागभांडवल असलेल्या किरकोळ भागधारकांची संख्या मार्चअखेर ५६.१२ लाखांवरून ५५.४ लाखांवर आली. टक्केवारीच्या बाबतीत, हा हिस्सा मार्चमधील २५.१२% वरून २५.०३% वर स्थिर राहिला.

चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

शेअरची स्थिती काय?

सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर, शुक्रवारी तो १.८% च्या घसरणीसह ₹६५.०९ वर बंद झाला. वर्षभर हा शेअर स्थिर राहिला आहे. अलीकडेच, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी मल्टीबॅगर स्टॉक सुझलॉन एनर्जीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन पुन्हा व्यक्त केला आणि प्रति शेअर ₹८२ ची टार्गेट प्राईज निश्चित केली. ब्रोकरेज आनंद राठी यांनी देखील प्रति शेअर ₹८१ अशी टार्गेट प्राईज दिली आहे. गेल्या दोन वर्षांत हा एनर्जी शेअर २७७% आणि गेल्या पाच वर्षांत १,२००% पेक्षा जास्त वधारला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक