Sudha Murthy: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी Infosys चे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांनी अलीकडेच तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यामुळे सोशल मीडियावर काहींनी त्यांना ट्रोल केले, तर काहींनी पाठिंबा दिला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून काम आणि खासगी आयुष्याचा ताळमेळ, याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. आता याच मुद्द्यावर इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि नारायण मूर्तींच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Infosys इतकं मोठं झालं इतकंच नाहीलोकांना जेव्हा एखादी गोष्ट गांभीर्याने आणि उत्कटतेने करायची असते, तेव्हा वेळेची मर्यादा नसते, असे मत प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी व्यक्त केले आहे. एनडीटीव्हीच्या 'इंडिया थ्रू द आयज ऑफ इट्स आयकॉन्स' शोमध्ये बोलताना सुधा मूर्ती म्हणतात, "माझ्या पतीने पैसे नसताना काही मेहनती आणि समर्पित सहकाऱ्यांच्या मदतीने इन्फोसिस बनवण्याचा निर्णय घेतला होता. आज ते या पदावर पोहोचले, कारण त्यांनी 70 किंवा कधी कधी त्याहूनही अधिक तास काम केले. तसे नसते, तर इन्फोसिस या उंचीवर पोहोचली नसती. इन्फोसिसला एवढी मोठी कंपनी बनवणारी 'जादूची कांडी' नव्हती. यात मेहनत, काही प्रमणात नशीब, योग्य वेळी योग्य निर्णय...अशा अनेक गोष्टींचा समावेश होता.
अशाप्रकारे वर्क-लाइफ बॅलन्स झालेसुधा मूर्ती यांना विचारण्यात आले की, वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ कुठे उरला आहे? प्रत्युत्तरात त्या म्हणाल्या, जेव्हा नारायण मूर्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माझ्याशी बोलायचे, तेव्हा मी त्यांना (नारायण मूर्ती) सांगायचे की, तुम्ही इन्फोसिसची काळजी घ्या, मी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेईल. मी स्वतः हा निर्णय घेतला आणि हेदेखील ठरवले होते की, माझ्या पतीकडे तक्रार करण्यात काही अर्थ नाही.
अनेक लोक 90-90 तास काम करतातसुधा मूर्ती पुढे म्हणाल्या की, फक्त माझे पतीच नाही, तर तर पत्रकार आणि डॉक्टरांसह इतर अनेक व्यवसायातील लोक आठवड्यातून 90-90 तास काम करतात. देवाने प्रत्येकाला 24 तास दिले आहेत. आता तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता, हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला कोणतेही काम आवडीने करायचे असेल, तर त्यासाठी वेळ लागेल आणि तुम्हाला तुमचे काम आवडीने करायचे असेल, तर तुमच्या जोडीदारानेही तुम्हाला साथ दिली पाहिजे.