Join us

१० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या शेअरमध्ये अचानक जोरदार खरेदी; बोर्ड मीटिंगमध्ये झालेला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:49 IST

Vodafone Idea Ltd Share: कंपनीच्या संचालक मंडळाच्या एका निर्णयानंतर शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. असं असलं तर गेलं एक वर्ष कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी मात्र डोकेदुखीचं ठरलंय.

Vodafone Idea Ltd Share: व्होडाफोन आयडियाचा शेअर आज सकाळी २ टक्क्यांहून अधिक वधारला. सोमवारी संचालक मंडळाच्या निर्णयामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ दिसून आली. कंपनीच्या संचालक मंडळानं १,९८० कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास सोमवारी मंजुरी देण्यात आली. बीएसईवर कंपनीचा शेअर ८.२५ रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत ८.२९ रुपयांच्या पातळीवर पोहोचली. मात्र, त्यानंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्येही घसरण झाली. ज्यामुळे शेअर्स ८.०८ रुपयांवर व्यवहार करू लागले.

बैठकीत काय निर्णय झाला?

"व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या ९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे १,७५५,३१९,१४८ इक्विटी शेअर्स १.२८ रुपये प्रति शेअर्स इश्यू प्राइसवर जारी करण्यास मान्यता देण्यात आली. व्होडाफोन समूहातील संस्था आणि प्रवर्तकांना ओमेगा टेलिकॉम होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड (१,२८० कोटी रुपयांपर्यंत) आणि उषा मार्टिन टेलिमॅटिक्स लिमिटेड (७०० कोटी रुपयांपर्यंत) यांना प्राधान्याने एकूण १,९८० कोटी रुपयांचे शेअर्स देण्यात येणार आहेत," असं व्होडाफोन आयडियानं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय. प्रेफरेंशियल इश्यूची किमान किंमत निश्चित करण्याची तारीख ६ डिसेंबर २०२४ आहे. या विषयाला मंजुरी देण्यासाठी ७ जानेवारी २०२५ रोजी कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

मागील वर्ष गुंतवणूकदारांसाठी नुकसानीचं

व्होडाफोन आयडियाच्या शेअर्ससाठी गेलं एक वर्ष चांगलं गेलेलं नाही. या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमती तब्बल ३७ टक्क्यांनी घसरल्या आहेत. तर २०२४ मध्ये कंपनीची कामगिरी खराब झाली आहे. या वर्षी हा शेअर ५२ टक्क्यांनी घसरलाय. व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षांत केवळ २३ टक्के वाढ झाली आहे. त्याहीपेक्षाही बीएसई सेन्सेक्स निर्देशांकानं अधिक परतावा दिलाय. बीएसई निर्देशांकानं १०२ टक्के परतावा दिलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)शेअर बाजार