Join us

आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:20 IST

टेक दिग्गज लॅरी एलिसन यांनी १० सप्टेंबर रोजी टेस्लाचे बॉस इलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला. परंतु कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊ.

Larry Ellison Success Story: टेक दिग्गज लॅरी एलिसन यांनी १० सप्टेंबर रोजी टेस्लाचे बॉस इलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला. मात्र, त्यांना जास्त काळ ते टिकवता आलं नाही आणि ते मस्क यांच्या मागे गेले. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, त्यांची संपत्ती काल १०१ अब्ज डॉलर्सनं वाढून ३९३ अब्ज डॉलर्स झाली आहे. यासह, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट आता एलोन मस्क यांच्या डोक्यावरून ओरॅकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांच्याकडे गेला. पण तुम्हाला माहीत आहे का, की या टप्प्यावर पोहोचलेल्या लॅरी एलिसन यांचं सुरुवातीचं आयुष्य प्रचंड संघर्षांनी भरलेलं होतं.

लॅरी एलिसन यांचा जन्म जून १९४४ मध्ये न्यूयॉर्कमध्ये एका अविवाहित ज्यू महिलेच्या घरी झाला. त्यांच्या आईनं त्यांना केवळ नऊ महिने त्यांच्याकडे ठेवलं आणि नंतर त्यांना नातेवाईकांकडे सोडलं. वयाच्या ४८ व्या वर्षापर्यंत लॅरी एलिसन यांनी आपल्या आईचा चेहरा पाहिला नाही. त्यांचं बालपण गरिबी आणि असुरक्षिततेत गेलं. त्यांना शिक्षणात कमी रस होता. त्यांनी इलिनॉय आणि शिकागो विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला, परंतु पदवी पूर्ण करू शकले नाहीत.

दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

कॅलिफोर्नियात आल्यानंतर झाला बदल

शाळा सोडल्यानंतर ते नोकरीच्या शोधात शिकागोहून कॅलिफोर्नियाला आले. त्याच वेळी त्याला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगची आवड निर्माण झाली. छोट्या छोट्या प्रकल्पांवर काम करत असताना त्यांना तंत्रज्ञानाची खोली समजत असे. मशीन आणि कोडिंगमधील ही आवड त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट बनली.

२००० डॉलर्सपासून व्यवसाय

१९७७ मध्ये, लॅरी आणि त्यांच्या मित्रांनी २००० डॉलर्समध्ये अॅम्पेक्स नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली, जी सुरुवातीला सरकारी प्रकल्पांसाठी डेटाबेस सॉफ्टवेअर बनवत होती. १९७७ मध्ये, एलिसन यांनी दोन भागीदारांसह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीजची (एसडीएल) सह-स्थापना केली, ज्याला नंतर ओरॅकल कॉर्पोरेशन असं नाव देण्यात आलं.

३७ वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी

लॅरी एलिसन यांनी ३७ वर्षे ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं. २०१४ मध्ये त्यांनी हे पद सोडलं, परंतु ते कंपनीशी संबंधित राहिले. आज ते ओरॅकलचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) आहेत. २०१२ मध्ये, त्यांनी हवाईचे लानाई बेट ३०० मिलियन डॉलर्समध्ये विकत घेतले आणि २०२० मध्ये तेथे स्थायिक झाले. पण कामाशी असलेलं त्यांचं नातं कधीच तुटलं नाही.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी