Success Story: एखादा चित्रपट एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो का? जर तुम्हाला याचं उत्तर नाही असं वाटत असेल तर तुमचं उत्तर चुकलंय. एमसीएस लॉजिस्टिक्स, अक्षय एंटरप्रायजेस, जला बेव्हरेजेस, पर्पल हेज वेलनेस स्पेस आणि न्यूट्री प्लॅनेटचे मालक राजा नायक यांच्याबद्दल जाणून घेतलं तर तुमचा दृष्टिकोन नक्कीच पूर्णपणे बदलेल. एकेकाळी उपासमार आणि गरीबीशी झुंज देणारे राजा आता सुमारे १०० कोटी रुपयांचा व्यवसाय करतात. लहानपणी मित्राच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन यांचा त्रिशूल चित्रपट पाहिला आणि यानंतर त्यांचं नशीब पालटून गेलं. या चित्रपटानं त्यांना इतकी प्रेरणा दिली की वयाच्या १७ व्या वर्षी ते व्यवसायात उतरले. वर्षानुवर्षांची कठोर तपश्चर्या, जिद्द, पुन्हा पुन्हा पडून पुन्हा उठण्याचं धाडस आणि गरिबीतून बाहेर पडण्याचे स्वप्न यामुळे राजा कोट्यधीश झाले. राजा यांची कहाणी त्रिशूल चित्रपटाच्या नायकापेक्षा कमी नाही, जिथे संघर्षाच्या प्रत्येक थरानंतर एक नवीन वळण येतं आणि ती व्यक्ती इतरांसाठी उदाहरण बनते.
राजा नायक यांचा जन्म बंगळुरू येथील एका गरीब कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांना आपल्या आई-वडिलांच्या परिस्थितीची कल्पना आली. त्यांना शाळेत पाठवण्यासाठी पैसे नाहीत हे त्यांना समजलं होतं. परिणामी त्यांना शाळा सोडावी लागली. १९७८ मध्ये अमिताभ बच्चन यांचा त्रिशूल हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. रिअल इस्टेट बिझनेसमन बनून एक गरीब माणूस कसा उंचावर पोहोचतो, हे त्यांनी त्या चित्रपटात पाहिलं होतं. थिएटरमध्ये घालवलेले ते तीन तास त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
१७ व्या वर्षी घर सोडलं
काहीतरी मोठं करण्याच्या इच्छेनं राजा नायक यांनी वयाच्या १७ व्या वर्षी घर सोडलं आणि मुंबईला आले. पण त्यांना यश मिळालं नाही. ते परतले, पण हार मानली नाही. ते योग्य संधी शोधत राहिले. त्यांनी बेंगळुरूमध्ये फूटपाथवर काही लोकांना वस्तू विकताना पाहिलं होतं. त्यांनी त्यांचा मित्र दीपक यांच्यासोबत या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
आईच्या बचतीतून व्यवसाय
राजा यांची आई थोडेफार पैसे वाचवायची. आईच्या बचतीतील १०,००० रुपये वापरून ते तामिळनाडूतील तिरुप्पूरला पोहोचले आणि तिथून ५० रुपयांना स्वस्त शर्ट खरेदी केले आणि ते बेंगळुरूला आणले. त्यांनी सर्व शर्ट निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे खरेदी केले. यामागे एक विशेष उद्देश होता. त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर एक कारखाना होता. त्याचे कर्मचारी फक्त निळे आणि पांढरे शर्ट घालायचे. ते त्याच्या मित्र दीपक यांच्यासोबत कारखान्याच्या गेटबाहेर ते विकायला बसले. एका दिवसात त्यांनी सर्व शर्ट विकले आणि ५,००० रुपयांचा नफा मिळवला. राजा यांना येथून समजले की कठोर परिश्रम आणि योग्य संधी हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे.
व्यवसाय वाढतच गेला
शर्टसोबतच त्यांनी बूट आणि घरगुती वस्तू विकायला सुरुवात केली. व्यवसाय सुरू झाल्यावर त्यांनी प्रदर्शन स्टॉल लावले, मुलांना कामावर ठेवलं आणि स्वतः एक संपूर्ण विक्री व्यवस्था उभी केली. एवढंच नाही तर त्यांनी कोल्हापुरी चप्पल आणि बुटांचा व्यवसायही सुरू केला.
१९९१ मध्ये पॅकेजिंग व्यवसायात प्रवेश
१९९१ मध्ये उदारीकरणानंतरच्या भारताच्या प्रवासातील पुढचं मोठं पाऊल म्हणजे राजा यांनी अक्षय एंटरप्रायझेसची सुरुवात केली आणि पॅकेजिंग व्यवसायात उडी घेतली. १९९८ मध्ये त्यांनी लॉजिस्टिक्सच्या जगात प्रवेश केला आणि एमसीएस लॉजिस्टिक्सची स्थापना केली, जी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कंपनी आहे. त्यांचा विस्तार इथेच थांबला नाही. त्यांनी जाला बेव्हरेजेस नावाची पेयजल कंपनी स्थापन केली, बंगळुरूमध्ये पर्पल हेझ नावाची तीन ब्युटी सलून आणि स्पाची चेन सुरू केली आणि नंतर न्यूट्री प्लॅनेटची स्थापना केली, जी वैज्ञानिक संशोधनासह हेल्थ फूड आणि एनर्जी बार तयार करते.
आज आहेत कोट्यधीश
राजा नायक आज एक यशस्वी उद्योगपती आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. त्यांच्यासारख्या परिस्थितीत असलेली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी "कलानिकेतन एज्युकेशनल सोसायटी" अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयं सुरू केली. ते "दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (DICCI)" च्या कर्नाटक शाखेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. सध्या ते दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष आहेत.