Join us
Daily Top 2Weekly Top 5

Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:37 IST

Arunabh Sinha Success Story: कपडे धुवून कोट्यधीश होता येतं का? तर याचं उत्तर 'हो' असं आहे. पाहा कसा होता यांचा आजवरचा प्रवास.

Arunabh Sinha Success Story: कपडे धुवून कोट्यधीश होता येतं का? तर याचं उत्तर 'हो' असं आहे. झारखंडमध्ये जन्मलेल्या आणि बिहारच्या भागलपूरशी नातं असलेल्या अरुणाभ सिन्हा (Arunabh Sinha) यांनी हे करून दाखवलंय. ही बाब केवळ एक-दोन कोटींची नसून त्याहून अधिक आहे. त्यांनी २०१७ मध्ये आपली पत्नी गुंजन तनेजा यांच्यासह 'UClean' नावाची लाँड्री आणि ड्राय क्लीनिंग कंपनी सुरू केली. आज त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपयांहून अधिक आहे.

कठोर परिश्रम आणि आयआयटी मुंबईतून शिक्षण

अरुणाभ यांचे शिक्षण आयआयटी मुंबईतून झालं आहे. त्यांचे वडील एका सरकारी रुग्णालयात सहाय्यक होते आणि आई गृहिणी होती. तीन भावंडांमध्ये अरुणाभ सर्वात धाकटे होते. त्यांचं कुटुंब एका छोट्या सरकारी क्वार्टरमध्ये राहत असे. लहानपणी शाळेत जाण्यासाठी त्यांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत असे, कारण रिक्षाचे भाडे देणेही त्यांच्या आवाक्याबाहेर होते. अभ्यासात हुशार असलेल्या अरुणाभ यांनी आयआयटी मुंबईतून मेटलर्जी आणि मटेरियल सायन्समध्ये पदवी पूर्ण केली. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना टाटा स्टील (साधरण ४.५ लाख वार्षिक पॅकेज) आणि 'ZS Associates' (८.९ लाख वार्षिक पॅकेज) कडून ऑफर मिळाली. त्यांनी 'ZS Associates' ची निवड केली आणि पुण्यात कामाला सुरुवात केली.

स्वतःचा स्टार्टअप आणि व्यवसायाचा प्रवास

२०११ मध्ये अरुणाभ यांनी 'Franglobal' नावाची स्वतःची कन्सल्टिंग फर्म सुरू केली. परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे हा याचा उद्देश होता. 'Franchise India' चे संस्थापक गौरव मार्या यांनी त्यांना ५० लाख रुपयांची गुंतवणूक करून मदत केली. २०१५ मध्ये अरुणाभ यांनी 'Franglobal' ही कंपनी 'Franchise India' ला विकली.

नोकरीत सापडली व्यवसायाची संधी

२०१५ मध्ये अरुणाभ यांचा विवाह गुंजन तनेजा यांच्याशी झाला आणि त्यांनी 'Treebo' या बजेट हॉटेल चेनमध्ये नोकरी सुरू केली. तिथे काम करत असताना अरुणाभ यांच्या लक्षात एक मोठी समस्या आली. हॉटेलमधील ग्राहकांना अस्वच्छ टॉवेल, चादरी आणि पडदे यामुळे त्रास होत होता. अरुणाभ यांना समजलं की लाँड्री सर्व्हिसमध्ये मोठी संधी दडलेली आहे. हे क्षेत्र ९९% असंघटित होतं आणि पूर्णपणे पारंपरिक कपडे धुणाऱ्यांवर अवलंबून होतं. याचं रुपांतर एका प्रोफेशनल सर्व्हिसमध्ये करता येईल, असा विचार त्यांनी केला.

२०१७ मध्ये UClean ची सुरुवात

२०१६ मध्ये अरुणाभ यांनी 'Treebo' सोडली आणि २०१७ मध्ये पत्नी गुंजनसोबत 'UClean' ची (Uconcepts Solutions Pvt Ltd) स्थापना केली. सुरुवातीला भांडवल उभं करणं कठीण होते. ५०-६० गुंतवणूकदारांशी चर्चा केल्यानंतरही कोणीही जोखीम घेण्यास तयार नव्हते. अरुणाभ जवळपास हार मानणार होते, तेव्हाच त्यांना दिल्ली-एनसीआरमध्ये सहा पारंपारिक ड्राय क्लीनिंग स्टोअर्स असलेले एक गुंतवणूकदार भेटले.

या गुंतवणूकदारानं अरुणाभ यांना दिल्लीतील वसंत कुंज आणि गुरुग्राममधील सुशांत लोक येथील आपले दोन स्टोअर्स भाड्यानं दिले. या स्टोअर्सचे 'UClean' मॉडेलमध्ये रूपांतर करण्यासाठी गुंतवणूकदारानं २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांनी अरुणाभ यांना कमर्शियल वॉशिंग मशिन, स्टीम टेबल आणि कॉम्प्युटर यांसारखी आवश्यक यंत्रसामग्री दिली. अरुणाभ यांनी कर्मचाऱ्यांचा पगार, वीज बिल आणि डिटर्जंटचा खर्च उचलला आणि व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

कंपनी फ्रँचायझी मॉडेलकडे वळली

यूक्लीनने लवकरच फ्रँचायझी मॉडेलद्वारे विस्तार करण्याचा निर्णय घेतला. ग्राहक अॅप आणि वेबसाइटद्वारे सहजपणे ऑर्डर देऊ शकतात. त्यांना त्यांच्या पसंतीच्या वेळी मोफत पिकअप आणि डिलिव्हरीचा लाभ घेता येईल. यूक्लीन २४ तासांच्या आत धुतलेले आणि इस्त्री केलेले कपडे धुऊन देण्याचं काम करते. इस्त्री करणं पर्यायी आहे. कंपनीची मुख्य सेवा "किलोनुसार कपडे धुणं" आहे, जी शहरानुसार बदलते.

कंपनीची कमाई किती?

आज, यूक्लीन केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही सेवा प्रदान करते. कंपनीचे ८०० हून अधिक आउटलेट्स आहेत आणि त्यांची उलाढाल १६० कोटींपेक्षा जास्त आहे. अरुणाभ यांची कहाणी दर्शवते की जर तुमच्याकडे चांगली कल्पना असेल आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही आव्हानावर मात करू शकता आणि यश मिळवू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : From Laundry to Lakhs: Arunabh Sinha's Inspiring Success Story

Web Summary : Arunabh Sinha, from humble beginnings, built UClean, a laundry and dry-cleaning company, with his wife. Starting with limited resources, they expanded via a franchise model. Today, UClean boasts over 800 outlets and a turnover exceeding ₹160 crore, proving determination leads to success.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसाय