Join us

Suzlon Energy : '...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 11:39 IST

Suzlon Energy Share: राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) या दोन्ही संस्थांनी रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीला वॉर्निंग लेटर दिलं आहे.

Suzlon Energy Share: राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) या दोन्ही संस्थांनी रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीला वॉर्निंग लेटर दिलं आहे. मार्केट रेग्युलेटर सेबीच्या नियमांचे पालन न केल्यानं कंपनीला हा इशारा देण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, सुझलॉन एनर्जीनं लिस्टिंग अँड एसेंशियल डिस्क्लोजर रूल्सचं (एलओडीआर) पालन केलं नाही, ज्यामुळे त्यांना ही नोटीस मिळाली आहे. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर ०.४५ टक्क्यांनी घसरला असून हा शेअर ७९.७३ रुपयांवर बंद झाला. कंपनीचं मार्केट कॅप १.०८ लाख कोटी रुपये आहे.

नोटीसमध्ये काय म्हटलंय?

कंपनीनं स्वतंत्र संचालक मार्क डेसेडेलियर यांच्या राजीनाम्याबद्दल आणि जूनमध्ये झालेल्या विश्लेषकांच्या कॉलबद्दल एक्स्चेंजला वेळेवर माहिती दिली नाही. 'मावळत्या स्वतंत्र संचालकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर कंपनीकडून मिळालेली उत्तरे आणि कागदपत्रांचा आढावा घेतला असता असं आढळलं की, कंपनीकडून कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या चांगल्या पद्धतींचे पालन करता आले असतं,' असं एक्स्चेंजनं नोटीसमध्ये म्हटलंय.

'पुन्हा चूक झाल्यास कारवाई होणार'

"तुमच्याकडून हे अनुपालन न करणं गांभीर्यानं घेण्यात आलेलं आहे. भविष्यात सावधगिरी बाळगण्याचा, योग्य दक्षता घेण्याचा आणि अशा त्रुटींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुधारात्मक पावलं उचलण्याचा सल्ला दिला जातोय, जेणेकरून सेबी एलओडीआरच्या लागू तरतुदींचे योग्य पालन सुनिश्चित होईल. भविष्यात काही त्रुटी असतील तर त्याकडे गांभीर्यानं पाहिले जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल," असं बीएसई, एनएसईनं म्हटलंय.

एक्सचेंजने आपल्या नोटीसमध्ये सुझलॉनने ९ जून २०२४ रोजी केलेल्या विश्लेषक आणि गुंतवणूकदार कॉलसंदर्भातील नियमांचे पालन न केल्याचा उल्लेख केला आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार, कंपन्यांनी अशा घटनांची माहिती किमान कामकाजाच्या दोन दिवस अगोदर शेअर बाजाराला द्यावी. परंतु संचालकांच्या राजीनाम्यानंतर चिंता दूर करण्यासाठी कंपनीने अल्पावधीतच हा कॉल नियोजित केला. दरम्यान, या मुद्द्यांचा कंपनीच्या आर्थिक किंवा कामकाजावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, अशी ग्वाही सुझलॉनने दिली आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक