Join us

बाजारात खळबळ! सेन्सेक्स-निफ्टी कोसळल्याने 'या' १० स्टॉक्सचे सर्वाधिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:08 IST

Stock Markets Today: निफ्टीचे सर्व निर्देशांक लाल रंगात व्यवहार करताना पाहायला मिळाले. सर्वात मोठी घसरण रियल्टी शेअर्समध्ये झाली. मेटल, पीएसयू बँक, ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्समध्येही मोठी घसरण झाली.

Stock Markets Today : सप्ताहाच्या पहिल्याच दिवश शेअर बाजारात खळबळ उडाली. बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार दबावाखाली आहेत. २६ सप्टेंबर २०२४ पासून सेन्सेक्स ९४८६ हून अधिक घसरला आहे. या काळात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज (सोमवारी) सेन्सेक्स जवळपास ८०० अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टीही २२५ अंकांच्या घसरणीसह उघडला. यात बँक निफ्टी तरी का मागे राहील? त्यानेही ४६० अंक खाली जात दणका दिला. मिडकॅप इंडेक्स ८०० अंकांनी घसरला होता. दरम्यान, रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर पोहचला आहे.

१५ लाख कोटी रुपयांचे नुकसानआजच्या कमजोरीनंतर, BSE वर लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात १५ लाख कोटी रुपयांची घट झाली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांवर जवळपास ९०% दबाव दिसून आला.

काही महिन्यांतील सर्वात मोठी घसरणआजच्या घसरणीमुळे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेली सर्व गती बाजाराने गमावली आहे. प्रमुख निर्देशांक आणि व्यापक बाजारांसह आज बाजारात चौफेर विक्री दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ४% पर्यंत घसरले. निफ्टी आणि सेन्सेक्स १.४% घसरत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकात आज ८ महिन्यांनंतर एक दिवसाची सर्वात मोठी घसरण झाली. त्याच वेळी, स्मॉल कॅपमध्ये आज एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ५ महिन्यांनंतर दिसून आली.

गुंतवणूकदारांनी काय करावं?बाजार तज्ज्ञ म्हणतात की मार्केटमध्ये आणखी करेक्शन्स दिसू शकते. निफ्टी २२,००० ते २२,२०० च्या पातळीवर जाऊ शकतो. सेन्सेक्स १००० च्या आसपास आणखी घसरू शकतो. डॉलरच्या सततच्या मजबूतीमुळे हे घडत आहे. बाजारात भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत, ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घ कालावधीसाठी बाजारात पैसे गुंतवले आहेत, त्यांनी होल्ड करावे असा सल्ला दिला जात आहे. जर तुम्ही अल्प मुदतीसाठी पैसे गुंतवले असतील तर वेट अँड वॉच या धोरणाचा अवलंब करा. तुम्ही लहान विक्री करून इतर स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकता.

जोपर्यंत डॉलर कमजोर होत नाही तोपर्यंत बाजारावर दबाव राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर शुल्क वाढवण्याची घोषणा केली तर अमेरिकेतील महागाई आणखी वाढेल. त्याचा परिणाम बाजारावरही दिसून येईल. देशांतर्गत शेअर बाजारावर नजर टाकली तर या तणावपूर्ण परिस्थितीतही आयटी, फार्मा, हॉटेल्स आणि एफएमसीजी सारख्या कंपन्यांची स्थिती चांगली दिसते. याउलट मेटल, NBFC, सरकारी बँका इत्यादी सतत कमजोर दिसत आहेत. गुंतवणूकदारांनी सध्यातरी त्यांच्यापासून अंतर ठेवावे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी