Stock Market News : देशांतर्गत शेअर बाजार बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या बैठकीचा दबाव बाजारावर पाहायला मिळाला. बैठकीतील निर्णयापूर्वी गुंतवणूकदार सावध पावलं टाकत आहेत. आज निफ्टी १३७ अंकांनी घसरुन २४,१९८ वर बंद झाला. सेन्सेक्स ५०२ अंकांनी घसरून ८०,१८२ वर आणि निफ्टी बँक ६९५ अंकांनी घसरून ५२,१३९ वर बंद झाला. सकाळची सुरुवात तुरळक घसरणीने झाली होती.
सेन्सेक्स १०० अंकांच्या घसरणीसह ८०,५९३ च्या आसपास तर निफ्टी २३ अंकांच्या घसरणीसह २४,३१२ वर उघडला. बँक निफ्टी १३४ अंकांनी घसरला आणि ५२,७०० च्या पातळीवर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांक ११ अंकांच्या किंचित घसरणीसह ५९,०९० च्या जवळ उघडला, त्यानंतर हिरव्या रंगात व्यवहार सुरू झाला. सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टी रिकव्हरी करताना दिसले.
या शेअर्समध्ये चढउतारआजच्या व्यवहारात फार्मा वगळता इतर सर्व निर्देशांक लाल रंगात बंद झाले. ऑटो, एनर्जी, पीएसयू बँक, मीडिया, रियल्टी ०.५ ते २ टक्क्यांनी घसरले. ट्रेंट, डॉ रेड्डीज लॅब्स, सिप्ला, विप्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले, तर टाटा मोटर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर ग्रिड कॉर्प, जेएसडब्ल्यू स्टील आणि एनटीपीसी घसरले. याशिवाय बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी एक टक्का घसरण नोंदवली गेली.
जागतिक बाजारातील अपडेट१९७८ नंतरच्या सर्वात मोठ्या नऊ दिवसांच्या घसरणीत, डाऊ जवळपास २७० अंकांनी खाली बंद झाला तर अमेरिकेतील नॅस्डॅक ६५ अंकांनी कमजोर होता. व्याजदरांबाबत यूएस फेडचा निर्णय आज रात्री उशिरा येईल. गिफ्ट निफ्टी २४३५० च्या जवळ ५५ अंकांनी घसरला. डाऊ फ्युचर्स ५० अंकांनी वधारले. तर जपानचा निक्केई १६५ अंकांनी कमजोर होता. कच्चे तेल सुमारे एक टक्क्याने घसरले आणि ते ७३ डॉलरच्या जवळपास होते. सोने सलग चौथ्या दिवशी २६६५ डॉलरवर कमजोर राहिले तर चांदी ३१ डॉलर वर कमजोर होती. देशांतर्गत बाजारात सोने २०० रुपयांनी घसरून ७६९०० च्या खाली, तर चांदी ३०० रुपयांनी घसरून ९०८०० च्या जवळ बंद झाली.