Join us

रिझर्व्ह बँकेकडून खूशखबर येताच शेअर बाजारात मोठी तेजी; निफ्टीसह सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 11:17 IST

रिझर्व्ह बँकने रेपो रेटबाबत घेतलेल्या निर्णयामुळे बाजार उघडताच तेजी पाहायला मिळाली आणि निफ्टीसह सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला.

Stock Market : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही पाहायला मिळाला. निफ्टीने पहिल्यांदाच २१०००ची पातळी गाठली असून सेन्सेक्सही ६९, ८८८ अंकांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. 

शेअर बाजारात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये काहीशी घसरण झाली होती. बीएसई सेन्सेक्स १३२ अंकांनी घसरून ६९, ५२१च्या पातळीवर बंद झाला होता. आज मात्र बाजार उघडताच तेजी पाहायला मिळाली आणि निफ्टीसह सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला. यामध्ये बँकिंग, मेटल आणि मीडिया सेक्टर सर्वांत पुढे असल्याचं पाहायला मिळालं. मात्र फार्मा सेक्टरमध्ये काहीशी निराशा दिसून आली.

रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या निर्णयाचा बाजारावर झाला परिणाम? रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ६ डिसेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान पार पडली. या बैठकीत रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पतधोरण समितीच्या ६ पैकी ६ सदस्यांनी रेपो दर कायम ठेवण्याच्या बाजूनं मत दिल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. यापूर्वीही रिझर्व्ह बँकेनं पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 

दरम्यान, शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे होम लोन किंवा अन्य कर्जांच्या ईएमआयवर कोणताही फरक पडणार नाही. व्याजदर कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांना आणखी थोडं थांबावं लागणार आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी