ड्रोन उत्पादक कंपनी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हा शेअर ३ दिवसांत ३७ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. हा शेअर सोमवारी बीएसईवर ७ टक्क्यांहून अधिक वधारला आणि ५०० रुपयांवर पोहोचला. या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत ८६४.१० रुपये तर नीचांकी पातळी ३०१ रुपये एवढी आहे. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीचे मार्केट कॅप २०७० कोटी रुपयांहून अधिक आहे.
३ दिवसांत ३७% हून अधिकचा परतावा - गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये ३७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ७ मे २०२५ रोजी हा शेअर ३५९.२० रुपयांवर बंद झाला होता. जो १२ मे २०२५ रोजी ५०० रुपयांवर पोहोचला. गेल्या एका वर्षाचा विचार करता, कंपनीच्या शेअर्समध्ये २३ टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे. याच वेळी, या वर्षी आतापर्यंत ड्रोन कंपनीचा शेअर सुमारे २० टक्क्यांनी घसरला आहेत. जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीत आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीला २५.७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. महसुलात मोठी घट झाल्याने कंपनीला हे नुकसान सहन करावे लागले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला १०.३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
IPO मधील शेअरची किंमत ६७२ रुपये होती.आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीच्या आयपीओमध्ये या शेअरची किंमत ६७२ रुपये एवढी होती. कंपनीचा आयपीओ २६ जून २०२३ रोजी बोलीसाठी खुला झाला होता आणि ३० जून २०२३ पर्यंत खुला होता. कंपनीचा शेअर ७ जुलै २०२३ रोजी बीएसईवर १३०५.१० रुपयांना सूचीबद्ध झाला होता. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीचा आयपीओ एकूण १०६.०६ पट सबस्क्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ८५.२ पट सबस्क्राइब झाला. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीमध्ये ८०.५८ पट बेट लावण्यात आली, तर पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीमध्ये १२५.८१ पट सबस्क्रिप्शन प्राप्त झाले होते.