Join us

गुंतवणूकदारांचे ३.४९ लाख कोटी रुपये पाण्यात; शेअर बाजार घसरणीची ४ प्रमुख कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:52 IST

stock market crashed : आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराने घसरण नोंदवली. बुधवारपासून लागू होणाऱ्या ट्रम्प टॅरिफ दरांपूर्वी गुंतवणूकदार सावध झाले आहेत.

stock market crashed : भारतीय शेअर बाजार सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत. थोड्या वाढीनंतर आज बाजार पुन्हा कोसळला. मंगळवारी १ एप्रिल रोजी आजच्या व्यवहारात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे, ज्यामध्ये आयटी आणि बँकिंग शेअर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यूएस टॅरिफ २ एप्रिलपासून लागू होण्यापूर्वी ही घट झाली आहे. आजचा व्यवहार सेन्सेक्स १,३९० अंकांनी घसरुन ७६,०२४ वर बंद झाला, तर निफ्टी ३५३ अंकांनी घसरून २३,१६५ वर बंद झाला. बाजारात आज चौफेर विक्री दिसून आली. बाजारातील मोठ्या घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले. आजच्या विक्रीत गुंतवणूकदारांचे ३.४९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यापाठीमागे ४ कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शेअर बाजार घसरण्यामागे कोणती कारणे?

  • ट्रम्प यांच्या टॅरिफची भीती : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार घाबरले आहेत. ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून भारतासह अनेक देशांवर शुल्क वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम आज बाजारात दिसून आला. बाजारात विक्रीचे वर्चस्व राहिले. 
  • आयटी समभागांवर दबाव : यूएस बाजारावर अवलंबून असलेल्या आयटी कंपन्यांचे शेअर्स आज १.८% ने घसरले. टॅरिफमध्ये वाढ झाल्यामुळे, आर्थिक मंदी आणि कमकुवत मागणीची चिंता वाढत आहे. मार्च तिमाहीत या क्षेत्राने आधीच १५% ची घसरण नोंदवली आहे. याचाही परिणाम आज बाजारावर झाला.
  • तेलाच्या किमतीत उसळी : कच्च्या तेलाच्या किमती पाच आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ आहेत, ज्यामुळे वाढत्या महागाईची चिंता वाढली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे ७४.६७ डॉलर होता. तर यू.एस. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) ७१.३७ डॉलरवर व्यापार करत होता. तेलाच्या उच्च किमती भारताच्या वित्तीय तूट आणि कॉर्पोरेट मार्जिनवर दबाव आणू शकतात.
  • रॅलीनंतर नफा-वसुली : गेल्या आठ सत्रांमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स सुमारे ५.४% वाढले, ज्यामुळे वर्षासाठी सकारात्मक दृष्टीकोन दिसून आला. नुकत्याच झालेल्या तेजीनंतर गुंतवणूकदार नफा बुक करत आहेत, त्यामुळे बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. अल्प कालावधीत मूल्यांकनात झालेल्या तीव्र वाढीमुळे काही व्यापारी सावध झाले आहेत, ज्यामुळे प्रमुख समभागांमध्ये विक्री झाली.

वाचा - झोमॅटोने अचानक ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कंपनीने का घेतला इतका मोठा निर्णय?

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी