Join us

स्पाइसजेटची १४ उड्डाणे रद्द; मॅक्स ७ विमानांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 04:50 IST

प्रवाशांना अन्य विमानांमध्ये घेणार सामावून

मुंबई/नवी दिल्ली : बोइंग ७३७ मॅक्स ८ विमानाच्या उड्डाणावर मंगळवारी बंदी घालण्यास तयार नसलेल्या हवाई नियामक ‘डीजीसीए’ने बुधवारी अचानक बंदीचा निर्णय घेतल्यामुळे स्पाइसजेटने आपली १४ विमान उड्डाणे रद्द केली. गुरुवारपासून काही अतिरिक्त विमानांची उड्डाणे केली जातील आणि त्यात बोइंग ७३७ मॅक्स ८साठी तिकिटे काढलेल्या प्रवाशांना सामावून घेण्यात येईल, असेही कंपनीने पत्रकात म्हटले आहे.स्पाइसजेटकडे १२ बोइंग मॅक्स ८ विमाने आहेत. कंपनीने म्हटले की, या विमानांच्या उड्डाणावर बंदी घातल्याने आम्हाला १४ उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. उड्डाणे रद्द केल्यामुळे गैरसोय झालेल्या बहुतांश प्रवाशांना इतर विमानांत सामावून घेण्यात आले आहे. तर उर्वरित प्रवाशांना तिकिटाचे संपूर्ण पैसे परत करण्यात आले आहेत. कंपनीच्या दृष्टीने सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आम्ही हवाई वाहतूक नियामक आणि विमान उत्पादक कंपनी यांच्याशी बोलत आहोत. तसेच प्रवाशांची अडचण होऊ नये, म्हणून विस्तारा एअरलाइन्सलाही परदेशांसाठी जादा विमाने सोडण्यास डीजीसीएने तात्पुरती परवानगी दिली आहे. सायंकाळी ४ वाजेनंतर बोइंग ७३७ मॅक्स ८ विमानास भारतीय हवाई क्षेत्रात उड्डाणास परवानगी देण्यात येणार नाही, असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. याआधीच १0 देशांनी या विमानांवर बंदी घातली आहे.पाच महिन्यातील दुसरा अपघातसूत्रांनी सांगितले की, रविवारच्या दुर्घटनेनंतर मॅक्स ८ विमानांबाबत सरकारही गंभीर बनले आहे. या विमानाचा पाच महिन्यांतील हा दुसरा अपघात आहे. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये इंडोनेशियाच्या लॉयन एअरच्या विमानाला अपघात होऊन १८९ जण ठार झाले होते.युरोपीय युनियन आणि इतर काही देशांनी बोइंग ७३७ मॅक्स ८ विमानांवर आपल्या हवाई हद्दीत उड्डाण करण्यास याआधी बंदी घातली आहे. स्पाइसजेटने म्हटले की, खबरदारीचा उपाय म्हणून बोइंग ७३७ मॅक्स ८ विमानांना देखभाल स्थळी नेण्यात आले आहे. तेथे त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात येईल.

टॅग्स :स्पाइस जेट