Join us

"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:29 IST

Edelweiss Mutual Fund Radhika Gupta: एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी अलीकडेच पर्सनल फायनान्सबाबत एक उत्तम सल्ला दिला आहे, जो केवळ गुंतवणुकीपुरता मर्यादित नाही.

Edelweiss Mutual Fund Radhika Gupta: एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी अलीकडेच पर्सनल फायनान्सबाबत एक उत्तम सल्ला दिला आहे, जो केवळ गुंतवणुकीपुरता मर्यादित नाही. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लोकांना केवळ SIP खरेदी करण्याचाच नव्हे तर त्यांना आनंद देणाऱ्या गोष्टींवरही खर्च करण्याचा सल्ला दिलाय.

या पोस्टमध्ये राधिका गुप्ता यांनी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत लिहिलंय. 'मी हा प्रवास एक स्वप्न उराशी बाळगून सुरू केला होता, आज एका छोट्याशा आनंदानं माझ्या मनाला स्पर्श केला. कष्टाची गोडी एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देते," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. कष्टाने मिळवलेल्या यशाचा आस्वाद घेणं आणि त्याचा आनंद उपभोगणं हे गुंतवणूक करण्याइतकेच महत्त्वाचं आहे.

₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

माझं काम एसआयपी विकणं, पण...

"माझं काम एसआयपी विकण्याचं आहे. परंतु मी कायमच सर्वांना सांगते की तुम्ही युवा असाल किंवा ज्येष्ठ, आपल्या मेहनतीच्या फळाचा आनंद घेणं आवश्यक आहे. बचत तर कराच, पण तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरही खर्च करा. कारण या गोष्टी तुमचा प्रवास विशेष बनवतात. जीवन म्हणजे कोणाकडे किती रुपये किंवा एनएव्ही आहे हे पाहण्याची शर्यत नाही. पण कोण आनंददायी जीवन जगलं हे महत्त्वाचं असतं," असंही राधिका गुप्ता यांनी नमूद केलं.

फिनफ्लुएन्सर्सच्या मोठ्या कमाईच्या चर्चांपासून सावध

"सोशल मीडियावर फायनान्स एक्सपर्ट्स ज्या कमाईचं आश्वासन देतात, त्यापैकी अनेक ऑफर्स गुंतवणुकीचा उत्तम अनुभव असणाऱ्यांसाठी असतात. सामान्य लोकांची याची जोखीम घेऊ नये. एसआयपी हा गुंतवणूक करण्याचा आणि सोपा आणि विश्वासार्ह पर्याय आहे, याद्वारे पैसे हळूहळू वाढतात," असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :गुंतवणूकपैसा