Spam Calls : देशात इंटरनेटचा वेग वाढल्यापासून सायबर गुन्हेगारांनी पोलीस प्रशासनाच्या नाकी नऊ आणले आहेत. विविध प्रकारे लोकांना अडकवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे. अलीकडे स्पॅम कॉल्स आणि मेसेजच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर ठग फक्त एका मेसेज किंवा कॉलने लोकांची फसवणूक करत होते. काही सेकंदात त्यांची बँक खाती रिकामी होत होती. या पार्श्वभूमीवर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) अनेक पावले उचलली होती. ट्रायनेही सर्व टेलिकॉम कंपन्यांना कडक मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ट्रायच्या निर्णयांचा परिणाम दिसू लागला आहे. सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या ३ महिन्यांत स्पॅम संदेशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
स्पॅम कॉल आणि मेसेजमध्ये २० टक्के घटसरकारने जारी केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत स्पॅम कॉल आणि मेसेजमध्ये २० टक्के घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात स्पॅम कॉल आणि मेसेजबाबत सुमारे १.५१ लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात या तक्रारींची संख्या १.६३ लाख झाली होती. ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये तक्रारींमध्ये सुमारे १३ टक्के घट झाली आहे.
काय होते ट्रायचे आदेश?स्पॅम कॉल आणि मेसेज कमी करण्यासाठी ट्रायने अनेक सूचना जारी केल्या होत्या. ट्रायने नियमांचे उल्लंघन करून प्रमोशनल व्हॉईस कॉल करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये दूरसंचार साधने बंद करणे, दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकणे आणि काळ्या यादीत टाकण्याच्या कालावधीत नवीन संसाधन वाटपावर बंदी घालणे यांचा समावेश आहे. याशिवाय ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना स्पॅम कॉल्स आणि मेसेजबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. ट्रायच्या या पावलाचा अवघ्या एका महिन्यात परिणाम दिसून आला आहे. आगामी काळात स्पॅम कॉल्स आणि मेसेज पूर्णपणे बंद होतील अशी अपेक्षा आहे.
सायबर गुन्हेगारीबाबत सावध राहाअलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगार वेगवेगळे ट्रॅप टाकून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. अशात लोकांनी सावध राहण्याचे आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, बँक खात्याची संवेदनशील माहिती शेअर करू नये किंवा कुठल्या शेअर मार्केट किंवा रात्री श्रीमंत होण्याच्या भानगडती पडू नये, असंही सांगितलं आहे.