मोरेश्वर मानापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सोने आणि चांदीच्या बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजीचे वारे वाहू लागले आहेत. गुंतवणूकदारांचा वाढता ओढा, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार आणि डॉलरच्या किमतीतील बदल यांचा थेट परिणाम या मौल्यवान धातूंवर दिसून आला आहे. सप्टेंबर महिन्यात नागपुरात चांदीने (जीएसटीसह) तब्बल २१,५२७ रुपयांची झेप घेतली असून सध्या चांदीचे २९ सप्टेंबरला किलोमागे दर १,४९,२४७ रुपयांवर पोहोचले. तर सोन्याच्या किमतींमध्येही मोठी उसळी दिसून आली असून सोन्याने सुमारे ११ हजारांची वाढ नोंदवली.
चांदीचा झपाट्याने वाढणारा दर
१ सप्टेंबरला चांदीचे किलो दर ३ टक्के जीएसटीसह १,२७,७२० रुपयांच्या आसपास होते. पहिल्या आठवड्यापासून सतत वाढ होत गेली. १५ सप्टेंबर रोजी दर १,३२,५६१ रुपयांपर्यंत पोहोचले. ही वाढ गुंतवणूकदारांसाठी तर फायदेशीर ठरलीच, पण उद्योग क्षेत्रासाठी मात्र आव्हान ठरत आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पॅनेल, वैद्यकीय उपकरणे अशा अनेक क्षेत्रांत चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
सोन्यातही झळाळी
सोन्याचे दरही सप्टेंबर महिन्यात झपाट्याने वाढले. ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमतींमध्ये ११ हजार रुपयांची वाढ होऊन २९ रोजी भावपातळी १,१८,९६५ रुपयांवर पोहोचली. १ सप्टेंबरला सराफांकडे सोने १,०७,९४४ रुपयांत विकल्या गेले. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर ताण आला. विशेषत: दसरा, दिवाळी आणि लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या खरेदीत गती येणार असली तरी ग्राहकांना जास्तीचा खर्च करावा लागेल.