लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि स्थानिक मागणीच्या जोरावर मौल्यवान धातूंच्या किमतींनी सोमवारी ऐतिहासिक उच्चांक गाठला. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या दराने तब्बल १०,००० रुपयांची मोठी उडी घेत प्रतिकिलो ३ लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे, सोन्यानेही आपली घोडदौड कायम ठेवत १.४८ लाखांचा नवा टप्पा गाठला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी चांदी २,९२,६०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, ती सोमवारी ३,०२,६०० रुपयांवर पोहोचली. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अस्थिरता यामुळे चांदीच्या दरात ही विक्रमी वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सोन्याच्या दरातही सोमवारी १,९०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा दर १,४८,१०० रुपये (प्रति १० ग्रॅम) या नव्या शिखरावर पोहोचला आहे. लग्नसराईचा हंगाम आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे किमतींना बळ मिळत आहे.
एकाच महिन्यांत ६६,८९९ रुपयांची वाढ
२०२५ च्या प्रचंड दरवाढीनंतर, चांदीने २०२६ सालाची सुरुवातही विक्रमी वेगाने केली आहे. जानेवारी महिन्याच्या अवघ्या १९ दिवसांत चांदीच्या किमतीत तब्बल ६६,८९९ रुपयांची अवाढव्य वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी एक किलो चांदीचा भाव २,३५,७०१ रुपये होता, तो आता वाढून ३,०२,६०० रुपये या ऐतिहासिक स्तरावर पोहोचला आहे. याचाच अर्थ चांदीच्या किमतीत दिवसाला साधारणपणे ३,५२१ रुपये अशी वाढ होत आहे.
किमती का वाढत आहेत?
- सुरक्षित गुंतवणूक : युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोन्याला पसंती देत आहेत.
- डॉलरची घसरण : आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याला समर्थन मिळत आहे.
- मध्यवर्ती बँकांची खरेदी : जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याचा साठा वाढवला जात आहे.
तज्ज्ञांचा सल्ला काय?
चांदीच्या किमतींनी अतिशय अल्प कालावधीत मोठी झेप घेतल्यानंतर आता काही प्रमाणात नफावसुली होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या काळात चांदी व सोन्याच्या दरांमध्ये मर्यादित चढ-उतार होऊन किमती काहीशा स्थिरावू शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने दोन्ही मौल्यवान धातूंबाबतचा कल सकारात्मकच असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
२०२५ मध्ये सोने ७५ टक्के महाग
गेल्या वर्षी सोन्याच्या किमतीत ५७,०३३ (७५%) वाढ झाली. ३१ डिसेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,१६२ रुपये होती आणि ३१ डिसेंबर २०२५ रोजी ती १,३३,१९५ वर पोहोचली.
Web Summary : Silver prices skyrocketed to ₹3 lakhs per kg, while gold reached ₹1.48 lakhs per 10 grams amid global market trends and local demand. Experts suggest potential profit-booking may stabilize prices after recent surges driven by investment safety and central bank buying.
Web Summary : वैश्विक बाजार और स्थानीय मांग के चलते चांदी ₹3 लाख प्रति किलो और सोना ₹1.48 लाख प्रति 10 ग्राम पर पहुंचा। विशेषज्ञों का मानना है कि मुनाफावसूली से कीमतों में स्थिरता आ सकती है, निवेश सुरक्षा और केंद्रीय बैंकों की खरीद से तेजी आई।