Join us

गुड न्यूज! चांदी २ हजार, तर सोने ५५० रुपयांनी घसरले; आठ महिन्यांतील सर्वात कमी भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 09:19 IST

गेल्या आठ महिन्यातील हे सर्वात कमी भाव आहेत.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चढ-उतार होत असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी थेट दोन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. गेल्या आठ महिन्यातील हे सर्वात कमी भाव आहेत. सोन्याच्याही भावात ५५० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले. 

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून किरकोळ, तर कधी मोठा चढ-उतार होत असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी (दि.१७) पुन्हा मोठी घसरण झाली. यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी ६६ हजारांच्या पुढे असलेल्या चांदीच्या भावात एक हजाराने घसरण होऊन ती गेल्या आठवड्यात ६५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. तेव्हापासून त्याच भावावर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात पुन्हा एक हजाराने घसरण होऊन ती गुरुवार, १६ सप्टेंबर रोजी ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर आता शुक्रवारी पुन्हा दोन हजार रुपयांची घसरण होऊन चांदी ६२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीची मागणी कमी झाल्याने व भारतीय शेअर बाजारातील वाढीचा परिणाम होऊन सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जानेवारीपासून होती वाढ

शुक्रवारी झालेल्या घसरणीमुळे चांदी आठ महिन्यातील सर्वांत कमी भावावर आली आहे. यापूर्वी ९ जानेवारी रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात पाच हजार ८०० रुपयांची घसरण होऊन ती ६४ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर दोन दिवसांत ११ जानेवारी रोजी पुन्हा चांदीत एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ६३ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर मात्र भाववाढ होत जाऊन चांदी ६४ हजारांच्या पुढेच होती. आता ती ६२ हजार ५०० रुपये प्रति किलो या नीचांकी भावावर आली आहे. 

टॅग्स :सोनंचांदी