Join us

वाहनांच्या टंचाईचे सावट राहणार वर्षभर; उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 06:43 IST

२०२२च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत सेमीकंडक्टरच्या टंचाईचा अंदाज ‘गार्टनर’ या अमेरिकतील संशोधन व सल्लागार संस्थेने व्यक्त केल्यामुळे वाहन व्यावसायिकांच्या डोईवर चिंतेचे ढग दाटले आहेत.

- अविनाश कोळीसांगली : सणांच्या मुहूर्तावर होणाऱ्या वाहनांच्या उलाढालीस सेमीकंडक्टरच्या (चिप्स्) वैश्विक टंचाईचा फटका बसत आहेत. २०२२च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत सेमीकंडक्टरच्या टंचाईचा अंदाज ‘गार्टनर’ या अमेरिकतील संशोधन व सल्लागार संस्थेने व्यक्त केल्यामुळे वाहन व्यावसायिकांच्या डोईवर चिंतेचे ढग दाटले आहेत. म्हणजेच आणखी वर्षभर तरी मागणीच्या तुलनेत वाहनांच्या उपलब्धतेचा तराजू असंतुलित राहणार आहे.सेमीकंडक्टरच्या बाबतीत अनेक देशांप्रमाणे भारताचे अवलंबित्वही अधिक आहे. तैवान, दक्षिण कोरिया या दोन देशांचा सेमीकंडक्टर चिप्स उत्पादनातील वाटा ७० टक्क्यांहून अधिक आहे. त्याखालोखाल अमेरिका, जपान, युरोप, चीन यांचा क्रमांक लागतो. कोरोनाकाळात अमेरिका व चीनमधील व्यापार संघर्ष, तैवानमधील उत्पादनात झालेली घट यांसह विविध कारणांनी सध्या सेमीकंडक्टरचा जागतिक तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसला आहे. अत्याधुनिक वाहने या सेमीकंडक्टरशिवाय निर्माण होऊ शकत नाहीत. त्यामुळे भारतातील अनेक वाहन कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. त्याचा फटका आता वाहनविक्रीवर होत आहे. वाहनांसाठी बुकिंग करूनही महिनोनमहिने ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. स्थानिक पातळीवरील वाहनविक्री करणारे व्यावसायिकही आता या तफावतीमुळे हैराण झाले आहेत. वाहनांच्या किमतीवरही या चिप्स टंचाईचा मोठा परिणाम झाला आहे.सेमीकंडक्टर चिप्स म्हणजे काय? स्वयंचलित गोष्टी ज्याठिकाणी आहेत तिथे ही इलेक्ट्रॉनिक्स् चिप्स वापरली जाते. संगणक, टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रीज यांसह आत्याधुनिक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह वाहनांसाठी हे सेमीकंडक्टर आता अविभाज्य भाग बनले आहे. आधुनिक वाहनांत आता इंधन नियंत्रण, स्पीडो मीटर, रिमोट लॉक, सेंट्रल लॉक, सेन्सर अशा अनेक गोष्टींसाठी हे चिप्स वापरले जाते.

टॅग्स :वाहन