Join us  

अनिल अंबानी समूहाचे 'अच्छे दिन'? एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात उसळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 5:25 PM

अनिल अंबानींच्या ताब्यातील कंपन्यांच्या शेअर्सचं मूल्य वधारलं

मुंबई: देशात एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला. रविवारी मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) अंदाज समोर आल्यानंतर आज मुंबई शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. सध्या संकटात असलेल्या अनिल अंबानी समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या दरात वाढ झाली. अनिल अंबानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सनी 3 ते 12 टक्क्यांची वाढ नोंदवली.  रविवारी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपलं. यानंतर वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल्सचे आकडे प्रसिद्ध केले. देशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येणार असल्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्समधून समोर आला. यानंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीची कामगिरी सुधारली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) 3 टक्क्यांनी वर गेला. दिवसभरात सेन्सेक्सनं 1300 अंकांची वाढ नोंदवली. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सच्या दरात 11.72 टक्क्यांची वाढ झाली. तर रिलायन्स निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनीच्या (आरएनएएम) शेअर्सनी 9.95 टक्क्यांची वाढ नोंदवली. मात्र दिवाळखोरीसाठी अर्ज करणाऱ्या रिलायन्स कम्युनिकेशनला दिलासा मिळाला नाही. रिलायन्स कम्युनिकेशनच्या शेअर्सच्या दरात 3.94 टक्क्यांची घसरण झाली. सध्या अनिल अंबानींच्या समूहातील बऱ्याच कंपन्या संकटात आहेत. रिलायन्स कॅपिटलनं भागीदार कंपनी असलेल्या  निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंटला स्वत:कडे असलेले 42.88 टक्के भागिदारी खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यानंतर आरएनएएमच्या शेअरचं मूल्य 9.96 टक्क्यांनी वधारुन 210 रुपयांवर गेलं.  

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९अनिल अंबानीशेअर बाजारभाजपा