Join us
Daily Top 2Weekly Top 5

Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सची 1300 अंकांनी उसळी, निफ्टीसुद्धा 11,500च्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 10:06 IST

Share Market Update : कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यापासून मुंबई शेअर बाजारात तेजी आली

मुंबईः कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यापासून मुंबई शेअर बाजारात तेजी आली असून, ही तेजी सोमवारीही कायम असल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सनं 1300 अंकांनी उसळी घेतली. त्यामुळे शेअर बाजार 39,346.01 स्तरावर पोहोचला आहे. तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातल्या 50 शेअरचा निर्देशांक असलेला निफ्टीसुद्धा 11,500च्या स्तरावर व्यवहार करत आहे. निफ्टीतही 268.50 अंकांची वाढ नोंदविली गेली असून, तो 11,542.70च्या स्तरावर आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये तेजीचा संचार असल्याने बाजारात उत्साह दिसून आला. या उसळीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा लाखोंचा फायदा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सकाळी भारतीय उद्योगजगतासाठी विविध करसुधारणांची घोषणा केली. बाजाराने या सुधारणांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक 121.45 अंशांनी वाढीव पातळीवर (36214.92) खुला झाला होता. त्यानंतर तो 38378.02 अंशांपर्यंत वाढला होता. बाजाराच्या अखेरच्या सत्रामध्ये नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे तो काहीसा खाली येऊन 38,014.62 अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो 1921.15 अंश म्हणजेच 5.32 टक्के वाढला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 10746.80 अंशांवर खुला झाला होता. नंतर तो 11381.90 अंशांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. पुढे काहीसा खाली येऊन 11261.05 अंशांवर बंद झाला होता. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये  556.25 अंश म्हणजे 5.20 टक्के वाढ झाली. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये बाजारात तेजीचा संचार असल्याने बाजारात दिवाळीचा उत्साह दिसून आला.

टॅग्स :निर्देशांकशेअर बाजारनिफ्टी