Join us  

गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या अदानी ग्रुपच्या कंपनीचा धमाका, SBI लाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 12:25 PM

सध्या, अदानी ग्रीन एनर्जीचे बाजार मुल्य अनेक पटींनी वाढले आहे. कारण, अदानी ग्रीन स्टॉक हा हरित ऊर्जा सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरला आहे.

अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीन एनर्जीने साधारणपणे एक महिन्यापूर्वी, सूचीबद्ध असलेल्या भारताच्या सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांच्या क्लबमध्ये स्थान मिळवले होते. आता ही कंपनी भारतीय स्टेट बँकेलाही (एसबीआय) मागे टाकत सातव्या स्थानावर पोहोचली आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे सध्याचे बाजार भांडवल अथवा मार्केट कॅप सुमारे 4,33,286 कोटी रुपये एवढे आहे. तर, एसबीआयचे बाजार भांडवल जवळपास 4.26 लाख कोटी रुपये आहे. 

सध्या, अदानी ग्रीन एनर्जीचे बाजार मुल्य अनेक पटींनी वाढले आहे. कारण, अदानी ग्रीन स्टॉक हा हरित ऊर्जा सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरला आहे. अदानी ग्रीनचे  शेअर्स 2022 मध्ये मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहे. कारण या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दरवर्षी जवळपास 110 टक्यांचा परतावा दिला आहे.

गेल्या सहा महिन्यात अदानी ग्रीनच्या शेअर्सनी अदानी समूहाच्या कंपनीला आयटीसी, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी लिमिटेड, बजाज फायनांस आणि एसबीआयचे बाजारमूल्य पार करण्यास मदत केली आहे. ही पहिली बिगर-निफ्टी 50 कंपनी आहे. जिने बिग बॉईज क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

अदानी ग्रीन एनर्जीच्या वर, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टीसीएस, एचडीएफसी बँक, इंफोसिस, एचयूएल आणि आयसीआयसीआय बँक, या सहा कंपन्या सूचीबद्ध आहेत. यातली रिलायन्स इंडस्ट्रीज ही सर्वात मौल्यवान कंपनी आहे. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप सुमारे 17,72,971 कोटी रुपये एवढे आहे.

टॅग्स :अदानीएसबीआयव्यवसायशेअर बाजारशेअर बाजार