Join us

या आठवड्यातही मार्केट लाल की हिरवागार? गुंतवणूकदारांचे वाढले १३.४४ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 08:36 IST

आगामी सप्ताहामध्ये आंतरराष्ट्रीय स्थिती कशी राहते यावरच बाजाराची दिशा अवलंबून आहे.

प्रसाद गो. जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क 

आगामी सप्ताहामध्ये बाजारात डेरिव्हेटिव्हज् व्यवहारांची असलेली सौदापूर्ती आणि विविध आस्थापनांच्या तिमाही निकालांमुळे बाजार काहीसा अस्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, जगभरातील शेअर बाजारांमधील स्थिती आणि परकीय वित्तसंस्थांकडून होणारी खरेदी-विक्री ही बाजाराची दिशा निश्चित करेल. 

महिनाभरानंतर मागील सप्ताहात बाजाराने हिरवा रंग बघितला. या सप्ताहात सेन्सेक्समध्ये २.९ टक्क्यांची, तर निफ्टीमध्ये ३.०६ टक्क्यांची वाढ झाली. आगामी सप्ताहामध्ये आंतरराष्ट्रीय स्थिती कशी राहते यावरच बाजाराची दिशा अवलंबून आहे.

गुंतवणूकदारांचे वाढले १३.४४ लाख कोटी

शेअर बाजारामध्ये झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता १३ लाख ४४ हजार ३५६.८० कोटी रुपयांनी वाढली आहे. बाजार वाढल्यामुळे बाजारातील एकूण भांडवलामध्ये वाढ झाली असून, हे भांडवल २,५४.७८.४३५.६४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील महिनाभर गुंतवणूकदारांना नुकसानच सोसावे लागले आहे. 

...आणखी ३५ हजार कोटी काढून घेतले

मे महिन्याच्या पहिल्या वीस दिवसांमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारामधून ३५ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. वाढलेले व्याजदर आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतामधून पैसे काढून घेण्यात वाढ झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजार