Join us

चौफेर नफावसुलीमुळे घसरला बाजार; गुंतवणूकदारांचे १.३ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 07:01 IST

बीएसई १,२८१ अंकांनी तर निफ्टी ३४६ अंकांनी घसरला; सोमवारची तेजी टिकवण्यात अपयश, मागील आठवड्यात १०४८ अंकांची घसरण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रबंदी झाल्यानंतर सोमवारी बाजाराने विक्रमी उसळी घेतली होती. परंतु मंगळवारी ही तेजी टिकू शकली नाही. आयटी आणि रोजच्या वापराच्या वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरची नफावसुलीसाठी जोरदार विक्री झाल्याने बाजार घसरला. सेन्सेक्स मंगळवारी १,२८१ अंक म्हणजेच १.५५ टक्क्यांनी घसरून ८१,१४८ अंकांवर बंद झाला.

निफ्टीही ३४६ अंकांनी घसरून २४,५७८ अंकांवर स्थिरावला. बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मंगळवारी घटून ४३१.२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सोमवारी हेच ४३२.५६ लाख कोटी रुपये इतके होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारच्या संपत्तीत एकाच दिवसात १.२९ लाख कोटी रुपयांनी घट झाली.

कोणते शेअर्स घसरले ?

सेन्सेक्समधील २५ शेअर्स तोट्यात तर पाच शेअर्स फायद्यात राहिले. इन्फोसिसचे शेअर ३.५४% घसरले. पॉवर ग्रिड, इटर्नल, एचसीएल टेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, मारुती, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्सही घसरणीसह बंद झाले.

बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.९९% वाढला, तर मध्यम कंपन्यांशी संबंधित मिडकॅपमध्ये ०.१७टक्क्यांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स सोमवारी २,९७५ 3 अंकांची उसळी घेत सात महिन्यांच्या उच्चांकी ८२,४२९ अंकांवर बंद झाल्याचे दिसून आले होते तर निफ्टीही ९१६ अंकांच्या तेजीने २४,९२४ अंकांवर बंद झाला होता.

जागतिक बाजारात काय घडले?

दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय कंपोझिट वधारले, तर हाँगकाँगचा हँगसँग घसरला. युरोपमधील प्रमुख बाजारांमध्ये दुपारच्या व्यवहारात बहुतेक ठिकाणी तेजीचा कल होता.

चीन आणि अमेरिकेतील व्यापार तणाव कमी झाल्यानंतर सोमवारी अमेरिकेतील बाजार तेजीत होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी १,२४६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार