Join us

सीमेवर शस्त्रसंधीनंतर बाजार सुसाट; १६ लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत, ७ महिन्यांचा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 07:01 IST

आयटी, मेटल, रिअल्टी, टेक शेअर्सच्या खरेदीमुळे बाजाराला बळ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी झालेल्या सहमतीचे सोमवारी शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले. सेन्सेक्स आणि निफ्टीने सुमारे ४ टक्क्यांची उडी घेत एका व्यापार सत्रातील सर्वांत मोठी वाढ नोंदवली. आयटी, मेटल, रिअल्टी  व टेक क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीमुळे वाढीला बळ मिळाले. सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १६.१५ लाख कोटींनी वाढल्याने गुंतवणुकदारांच्या संपत्तीत भर पडली आहे. 

सेन्सेक्स २,९७५ अंकांनी वाढून ७ महिन्यांच्या उच्चांकी पोहोचला तर निफ्टी ९१६ अंकांनी वाढून २४,९२४ अंकांवर स्थिरावला. शुक्रवारी सेन्सेक्स ८८० अंकांनी घसरला होता. 

कोणते शेअर्स वाढले?

आयटी क्षेत्रातील इन्फोसिसने ७.९१ टक्क्यांची जोरदार उडी घेतली. एचसीएल टेक, टाटा स्टील, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्सचे शेअर्स लक्षणीय वाढीसह बंद झाले. फक्त सन फार्मा आणि इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सुमारे चार टक्क्यांची वाढ नोंदली गेली.

३ जून २०२४ चा विक्रम मोडला

दोन्ही निर्देशांकांनी याआधी ३ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी सर्वांत मोठी वाढ नोंदवली होती. त्या दिवशी सेन्सेक्समध्ये २,५०७ अंकांची आणि निफ्टीमध्ये ७३३ अंकांची मोठी वाढ झाली होती.

आशियायी बाजारातही तेजी 

आशियातील इतर बाजारांमध्ये, दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्केई २२५, चीनचा शांघाय कंपोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे निर्देशांक वाढीसह बंद झाले. युरोपचे बाजार सकारात्मक कलासह व्यवहार करत होते. शुक्रवारी अमेरिकेचे बाजार मिश्र कलासह बंद झाले होते. 

गुंतवणूकदारांत उत्साह वाढला

विश्लेषकांच्या मते दोन्ही देशांनी शस्त्रसंधीवर सहमती केल्याने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली. त्याशिवाय अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफच्या घोषणेमुळेही गुंतवणूकदार उत्साहित आहेत. अमेरिका आणि चीन यांनी एकमेकांवर लावलेले टॅरिफ ९० दिवसांसाठी स्थगित ठेवण्याची घोषणा केल्याने उद्योगविश्वात समाधानाचे वातावरण आहे. 

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार