Join us  

Share Market : Corona च्या नव्या व्हेरिअंटची भीती; एका दिवसात गुंतवणूकदारांना ७ लाख कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 7:12 PM

Share Market New Coronavirus Varient B.1.1.529 : कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटनं भारतासह जगभरातील गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे.

Share Market New Coronavirus Varient : कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटनं (B.1.1.529) गुंतवणूदारांची झोप उडवली आहे. भारतासह जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरल्याचं दिसून येतं. यामुळे आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना जवळपास सात लाख कोटी रूपयांचा फटका बसला.

आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बीएसईचं मार्केट कॅप ७ लाख ३६ हजार कोटी रूपयांनी कमी झालं. गुरूवारी शेअर बाजारात १६८७.९४ अंकांची घसरण होऊन निर्देशांक ५७,१०७.१५ अंकांवर पोहोचला. गुरूवारी शेअर बाजाराचं मार्केट कॅप २,६५,६६,९५३.८८ कोटी रूपये होतं. जे आता कमी होऊन २,५८३१,१७२.२५ कोटी रूपयांवर आले आहे.दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची माहिती मिळाली आहे. सध्या वैज्ञानिक त्यावर रिसर्चही करत आहे.

वैज्ञानिकांनी या नव्या व्हेरिअंटला B.1.1.529 हे नाव दिलं आहे. याशिवाय WHO ची आपात्कालिन बैठक बोलावण्याचीही मागणी केली आहे. परिस्थितीकडे पाहता दक्षिण आफ्रिकेतून अन्य देशांसाठी विमानसेवाही थांबवण्यात आली आहे. तर दुसरीकडे भारतही अलर्ट झाला आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे अर्थव्यवस्थेतील सुधारणेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे जगभरात अनेकांच्या मनात पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीतीही आहे. पुन्हा मार्गावर येणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा झटका आहे. याशिवाय विदेशी गुंतवणूकदारही बाजारातून पैसे काढत आहेत. शिवाय नफेखोरीचाही परिणाम बाजारावर दिसून येत आहे. 

टॅग्स :शेअर बाजारभारतद. आफ्रिका