मुंबई :शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने बुधवारी ५० हजार अंशांचा टप्पा पार केला असून, यामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी एकच जल्लोष केला. जागतिक बाजारामधील सकारात्मक वातावरण आणि गुंतवणूकदारांचा उत्साह यामुळे गुरुवारी सकाळीच निर्देशांकाने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. निर्देशांकाने ५०,१८४.०१ अंशांपर्यंत मजल मारून नवीन उच्चांक प्रस्थापित केला. यानंतर मात्र बाजारात नफा वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे दिवसअखेर निर्देशांक खाली आला. बाजारामध्ये गुरुवारचे व्यवहार सुरू झाले तेच मुळी सेन्सेक्स ५० हजारांच्या पुढे गेल्यानेच. त्यानंतरही काही काळ निर्देशांक वाढत होता. मात्र, त्यानंतर नफा कमविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाल्याने निर्देशांक खाली येऊ लागला. तो ४९,३९८.८६ अंशांपर्यंत खाली आला. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये थोडी वाढ झाली. बाजार बंद होताना हा निर्देशांक ४९,६२४.७६ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात १६७.३६ अंश म्हणजे ०.३४ टक्क्यांनी घट झाली.राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही सकाळी चांगली तेजी दिसून आली. येथील निर्देशांक (निफ्टी) १४,७०० अंशांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. त्यानंतर मात्र हा निर्देशांकही खाली आला. दिवसअखेरीस तो १४,५९०.३५ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा तो ५४.३५ अंश घसरला. कोरोनानंतर आर्थिक कारभार पुन्हा वेगाने सुरू झाला आहे. जागतिक पातळीवरील स्थिती चांगली असल्यामुळे परकीय गुंतवणुकीचा भारतामधील वेग वाढला आहे. त्यातच अमेरिकेमध्ये झालेल्या सत्तांतरामुळे तेथे अधिक आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे सर्वत्र तेजीचे वारे वाहत असल्याचा फायदा गुरुवारी सकाळी भारतीय शेअर बाजारामध्ये वाढीच्या स्वरूपात बघावयास मिळाला. असा झाला सेन्सेक्सचा प्रवास -१ जानेवारी १९८६ रोजी मुंबई शेअर बाजाराने संवेदनशील निर्देशांक सुरू केला. त्याचेच लघुरूप सेन्सेक्स म्हणून ओळखले जाते. २५ जुलै १९९० रोजी या निर्देशांकाने १००० अंशांचा टप्पा गाठला. निर्देशांक ५००० झाला तो ११ ऑक्टोबर १९९९ रोजी. ७ फेब्रुवारी २००६ रोजी १० हजार, ११ डिसेंबर २००७ रोजी २० हजार तर १६ मे २०१४ रोजी २५००० अंशांचा टप्पा पार झाला. निर्देशांक ४ मे २०१५ रोजी तीस हजारी बनला. नंतर १७ जानेवारी २०१८ रोजी ३५ हजार, २३ मे २०१९ रोजी ४० हजार तर ४ डिसेंबर २०२२० रोजी ४५ हजार अंशांचा टप्पा गाठला गेला.
सेन्सेक्सने पार केला 50 हजार अंशांचा टप्पा, नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे दिवसअखेर मात्र घसरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:54 IST