Join us

इंडसइंड बँकेने गुंतवणूकदारांना रडवले; १८,००० कोटी रुपये पाण्यात; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:12 IST

Share Market Today: मंगळवारी बाजारात मोठ्या घसरणीनंतर दिवसभरातील नीचांकी पातळीवरून चांगली रिकव्हरी दिसून आली. बँकिंग, आयटी आणि वाहन समभागात मात्र दबाव दिसून आला.

IndusInd Bank : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने आज जगभर खळबळ माजली. एका टीव्ही शोमध्ये बोलताना त्यांनी मंदीवर भाष्य केलं. यानंतर अमेरिकेसह जगभरातील मोठमोठे शेअर बाजार कोसळले. याला भारतही अपवाद राहिला नाही. मंगळवारी दिवसभर शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स १२.८५ अंकांनी घसरून ७४,१०२.३२ वर बंद झाला. त्याच वेळी, एनएसई निफ्टी ३७.६० अंकांच्या वाढीसह २२,४९७.९० अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात आज सर्वाधिक फटका इंडसइंड बँकेच्या समभागांना बसला. 

आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात, खराब जागतिक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. परंतु, काही काळानंतर, दिवसाच्या खालच्या पातळीपासून बाजारात तितकीच वेगवान रिकव्हरी दिसून आली. दिवसभराच्या कामानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स वाढीसह बंद झाले. मिडकॅप निर्देशांक तळापासून सुमारे १,००० अंकांच्या सुधारणेसह बंद झाला. क्षेत्रीय आघाडीवर नजर टाकल्यास रिॲल्टी, ऑइल अँड गॅस आणि पीएसई शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. फार्मा, एनर्जी, मेटल निर्देशांक वधारत बंद झाले.

इंडसइंड बँकेचे गुंतवणूकदार रडकुंडीलाफटका इंडसइंड बँकेचा शेअर २७.०२ टक्क्यांनी घसरुन ६५७.२५ रुपयांवर थांबला. त्यामुळे आज बँक शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे सुमारे १८ हजार कोटी रुपये बुडाले. इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये ही घसरण बँकेने आपल्या डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमधील उणीवा मान्य केल्यानंतर आली. ज्यामुळे बँकेचा नफा १५०० कोटी रुपयांनी कमी झाल्याचा अंदाज आहे. यानंतर आज शेअर ३ वेळा लोअर सर्किटला लागला.

परकीय गुंतवणूकदारांची खरेदी-विक्री५ दिवसात बँकेचे शेअर्स ३३.९३% घसरले आहेत. अमेरिकन बाजारातील कमजोरी आणि इन्फोसिसच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे, प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात लाल रंगात उघडले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ४८५.४१ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) २६३.५१ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

या शेअर्समध्ये चढउतारनिफ्टी बँकेच्या घसरणीत इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचा वाटा आहे. तर ICICI बँकेकडून या निर्देशांकाला सपोर्ट मिळाला. कच्च्या तेलाच्या किमतीतील स्थिरतेमुळे, तेल विपणन कंपन्यांच्या समभागांमध्ये २-३% वाढ झाली. एचडीएफसी लाइफचे शेअर्स २% वाढले. कारण कंपनीने फेब्रुवारीमध्ये प्रीमियम वाढ नोंदवली.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टीडोनाल्ड ट्रम्प