Join us  

सेन्सेक्स धडाम! शेअर बाजाराची जोरदार आपटी; गुंतवणूकदारांना ८ लाख कोटी रुपयांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 6:37 AM

फ्युचर समूहाच्या सीईओला अटक करण्याची मागणी ॲमेझॉनने केल्याचे वृत्त आहे. याचा फटका रिलायन्स व फ्युचरला बसला.

मुंबई : विक्रीचा जोरदार मारा झाल्यामुळे बुधवारी शेअर बाजारांनी जोरदार आपटी खाल्ली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९३७.६६ अंकांनी कोसळून ४७,४०९.९३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७१.४० अंकांनी घसरून १३,९६७.५० अंकांवर बंद झाला. शेअर बाजारांची ही सलग चौथ्या सत्रातील घसरण असून या चार सत्रांत गुंतवणूकदारांना ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

फ्युचर रिटेल्सचे समभाग तब्बल ५ टक्क्यांनी घसरले. बलाढ्य अमेरिकी कंपनी ॲमेझॉनने फ्युचर समूहाची रिटेल क्षेत्रातील मालमत्ता रिलायन्सला विकण्यास आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतल्यामुळे दोन्ही कंपन्यांना जबर फटका बसल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. 

ॲमेझॉनच्या आक्षेपामुळे ३.४ अब्ज डॉलरचा हा सौदा वादात सापडला. फ्युचरची मालमत्ता खरेदीच्या रिलायन्सच्या व्यवहारास सिंगापूर लवादाने आधीच स्थिगिती दिली असून याच्या अंमलबजावणीसाठी ॲमेझॉनने भारतीय न्यायालयात दावा केला आहे. फ्युचर समूहाच्या सीईओला अटक करण्याची मागणी ॲमेझॉनने केल्याचे वृत्त आहे. याचा फटका रिलायन्स व फ्युचरला बसला.

कंपन्यांचे भांडवली मूल्य घसरले...मागील चार सत्रांतील घसरगुंडीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तब्बल ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बीएसईतील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य ८,०७,०२५.०९ कोटी रुपयांनी घसरून १,८९,६३,५४७.४८ कोटी रुपये झाले आहे.

४ सत्रांत ८ लाख कोटी रुपयांचा फटका

रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग २.२९ टक्क्यांनी घसरून १,८९५ रुपयांवर आले. हा या समभागांचा महिनाभराचा नीचांक ठरला. 

 

टॅग्स :रिलायन्सशेअर बाजारअ‍ॅमेझॉन