Join us

शेअर बाजारात रंग बरसे...! Sensex पुन्हा एकदा ६०००० पार, अदानी समूहाची जबरदस्त कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 12:31 IST

Stock Market Today: होळीच्या सुट्ट्यांच्या आधी सोमवारी शेअर बाजारात तेजीचा कल दिसून आला आहे.

Stock Market Today: होळीच्या सुट्ट्यांच्या आधी सोमवारी शेअर बाजारात तेजीचा कल दिसून आला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत झालेली वाढ आणि ८ कंपन्यांमधील अपर सर्किटचा परिणाम बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्हींवर दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्सने ५०० हून अधिक अंकांची वाढ नोंदवली आहे आणि सेन्सेक्सनं पुन्हा एकदा ६०,००० चा टप्पा ओलांडला आहे. त्याचवेळी निफ्टीही सुमारे १५० अंकांच्या वाढीसह उघडला आहे.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ५१४.९७ अंकांच्या वाढीसह ६०,३२३.९४ अंकांवर सुरुवात केली. दुसरीकडे, निफ्टी १४९.९५ अंकांच्या वाढीसह १७,७४४.३० अंकांवर उघडला. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेले एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवणारे ठरले आहेत. 

अदानी स्टॉक्सला अप्पर सर्किटशेअर बाजारातील तेजीचे मुख्य कारण म्हणजे अदानी समूहाच्या ८ कंपन्यांमध्ये अप्पर सर्किट लागले होते. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालापासून, समूहाच्या कंपन्यांना शेअर बाजारात विक्रीचा सामना करावा लागला. त्यामुळे जवळपास सर्वांच्याच शेअरच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत होती. मात्र, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारातच समूहातील सिमेंट कंपन्या वगळता उर्वरित ८ कंपन्यांचे शेअर्स वधारलेले पाहायला मिळाले. यामध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर आणि एनडीटीव्ही यांचा समावेश आहे.

1,113 वरून 2,118 वर! Adani ला पुन्हा 'अच्छे दिन'; पाच सत्रांत ९० टक्क्यांची उसळी, अदानी पॉवरला 'अप्पर सर्किट'

आशियाई बाजारातही तेजीकेवळ भारतच नाही तर सोमवारी आशियातील बहुतांश बाजारांमध्येही तेजी दिसून आली. हाँगकाँग आणि जपानच्या बाजारात तेजी दिसून आली. दुसरीकडे युरोप आणि अमेरिकेचे शेअर बाजारही शुक्रवारी तेजीसह बंद झाले. चलनवाढीतील नरमाई पाहता बाजारातील ही प्रतिक्रिया उमटली.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिटेल रिसर्चचे प्रमुख दीपक जसानी यांनी आशियाई, युरोपियन आणि अमेरिकन बाजारांप्रमाणेच भारतीय बाजारपेठांमध्येही तेजीचा कल दिसू शकतो असं म्हटलं आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते हा आठवडा भारतात होळीचा सण आहे. अशा स्थितीत ७ मार्च रोजी शेअर बाजाराला सुट्टी असल्याने सोमवारी बाजारात प्रॉफिट बुकींग होताना दिसत आहे. बाजारातील तेजीचे हेही एक कारण आहे.

टॅग्स :निर्देशांकअदानी