Join us

Cafe Coffee Day वर सेबीची मोठी कारवाई, 26 कोटींचा ठोठावला दंड! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 13:27 IST

Cafe Coffee Day : सेबीने कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडला म्हैसूर अमलगमेटेड कॉफी इस्टेट्स लिमिटेडला (MACEL) दिलेले पैसे व्याजासह वसूल करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत

नवी दिल्ली : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) कॉफी डे एंटरप्रायझेसला 26 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला असून सेबीने कंपनीला दंड भरण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली आहे. कॉफी डेने आपल्या उपकंपन्यांचा पैसा प्रमोटरसंबंधी कंपनीत वापरल्याचा आरोप आहे.

कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या 7 सहयोगी कंपन्यांचे जवळपास 3535 कोटी रुपये म्हैसूर अ‍ॅमेलगमेटेड कॉफी इस्टेटमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्याचे सेबीला आपल्या तपासात आढळून आले आहे. या कंपन्यांमध्ये कॉफी डे ग्लोबल, टेंग्लिन रिटेल रिअॅलिटी डेव्हलपमेंट्स, टेंग्लिन डेव्हलपमेंट्स, गिरी विद्युत (इंडिया) लिमिटेड, कॉफी डे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, कॉफी डे ट्रेडिंग आणि कॉफी डे एकॉन यांचा समावेश आहे.

सेबीने कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडला म्हैसूर अमलगमेटेड कॉफी इस्टेट्स लिमिटेडला (MACEL) दिलेले पैसे व्याजासह वसूल करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच, थकबाकीच्या रकमेच्या वसुलीसाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी एनएसईकडून (NSE) ब्रोकर्स घेऊन स्वतंत्र कायदा फर्म नियुक्त करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.

शेअरची स्थिती : यादरम्यान आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी, कॉफी डे एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत 0.33% वाढून 45.45 रुपये झाली. व्यवहारादरम्यान शेअरची किंमत 45.85 रुपयांवर पोहोचली होती. दरम्यान, 27 जानेवारी 2022 रोजी शेअरची किंमत 78.90 रुपये होती, जी 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.

कंपनीचे डिटेल्स : कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड ही कॉफीची मूळ कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने उपकंपन्या, को-अॅप्स आणि संयुक्त उद्यम कंपन्यांद्वारे कॉफी रिटेल आणि निर्यात, व्यावसायिक ऑफिस स्पेस भाड्याने देणे, फायनान्स, मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी आणि आयटी सारख्या अनेक क्षेत्रात व्यवसाय करत आहे.

टॅग्स :व्यवसायशेअर बाजार