Salesforce layoffs :तंत्रज्ञानाच्या जगात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेने मोठी क्रांती घडवून आणली आहे. पण, यामुळे अनेकांच्या नोकऱ्यावर कुऱ्हाड कोसळली आहे. काही महिन्यांपूर्वीच भारतातील आघाडीटी आयटी सेवा कंपनी टीसीएसने १२,००० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची घोषणा केली. यात आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. अमेरिकेची एक मोठी टेक कंपनी सेल्सफोर्सने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हे सर्व कर्मचारी ग्राहक सेवा प्रतिनिधी होते. आता त्यांचे काम एआय करणार आहे.
अमेरिकेच्या या क्लाऊड सॉफ्टवेअर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क बेनिऑफ यांनी एका पॉडकास्टमध्ये ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “मी आमच्या सपोर्ट टीममधील कर्मचाऱ्यांची संख्या ९,००० वरून ५,००० पर्यंत कमी केली आहे, कारण आता मला कमी कर्मचाऱ्यांची गरज आहे.” याचा अर्थ, सेल्सफोर्सच्या सपोर्ट विभागातील जवळपास अर्ध्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, आता मानवी कर्मचाऱ्यांऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेवर अधिक विश्वास ठेवला जाईल.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे काय?सोप्या भाषेत सांगायचे तर, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशी एक तंत्रज्ञान प्रणाली, जी माणसांप्रमाणे विचार करू शकते, शिकू शकते आणि स्वतः निर्णय घेऊन कामे पूर्ण करू शकते. हे तंत्रज्ञान मानवी मेंदूप्रमाणे डेटाचे विश्लेषण करते आणि मोठ्या व क्लिष्ट कामांना स्वयंचलित पद्धतीने पूर्ण करते.
५०% संवाद एआयसोबतएका रिपोर्टनुसार, सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी खुलासा केला की, सर्वाधिक नोकऱ्यांची कपात सपोर्ट विभागात झाली आहे. या विभागात आधी ९,००० कर्मचारी होते, जे आता ५,००० झाले आहेत, म्हणजेच ४५% नोकऱ्या एका झटक्यात कमी झाल्या आहेत. बेनिऑफ यांनी याला 'रीबॅलन्सिंग ऑफ हेडकाऊंट' म्हटले असले तरी, या नोकऱ्यांची जागा थेट एआय एजंट्सनी घेतली आहे. बेनिऑफ पुढे म्हणाले की, ग्राहक सेवेसंबंधी सुमारे ५० टक्के संवाद आता एआयद्वारे होतो, तर उरलेला संवाद मानवी कर्मचारी पूर्ण करतात.
एका रात्रीत कपात का?या निर्णयामागील कारण सांगताना बेनिऑफ म्हणाले की, आधी टीममध्ये पुरेसे लोक नव्हते. त्यामुळे एखादा ग्राहक कॉल केल्यावर कंपनी त्यांच्याशी संपर्क साधू शकत नव्हती. आता एआय एजंट्सच्या मदतीने कॉल करणाऱ्या ग्राहकांना लगेच उत्तरे दिली जात आहेत. बेनिऑफ काही काळापूर्वीपर्यंत दावा करत होते की, एआयमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार नाही. पण आता त्यांच्याच कंपनीने 'एजंटफोर्स' सारखे एआय टूल्स बाजारात आणले आहेत, जे स्वयंचलित उपाय देऊन काम वेगाने पूर्ण करत आहेत. याचा परिणाम म्हणून मानवी कर्मचाऱ्यांची गरज घटली आहे आणि हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.
वाचा - चांदीने दिला तब्बल ४०% परतावा! पहिल्यांदाच १.२५ लाखांचा टप्पा पार, ‘या’ कंपन्यांना मोठा फायदा
सेल्सफोर्स एकमेव कंपनी नाहीएआयचा फटका बसलेली सेल्सफोर्स ही एकमेव कंपनी नाही. मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल, मेटा आणि टीसीएस सारख्या दिग्गज कंपन्यांनीही २०२५ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. Layoffs.fyi च्या अहवालानुसार, या वर्षी आतापर्यंत जगभरात ८०,००० पेक्षा जास्त टेक कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे. सेल्सफोर्सची ही घटना एआयमुळे नोकरीच्या बाजारपेठेत होणाऱ्या मोठ्या बदलांचा एक स्पष्ट पुरावा आहे.