दिल्ली-एनसीआर आणि मुंबईसह आठ प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षी जुलै ते डिसेंबर दरम्यान १२ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या कालावधीत ३ लाख ५० हजार ६१३ घरांची खरेदी करण्यात आली. २०२३ च्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण ७ टक्क्यांनी अधिक आहे. मुंबईतील घरांची विक्री तब्बल ११ टक्क्यांनी वाढून १३ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमधील विक्री तब्बल ४ टक्क्यांनी घटली आहे. दिल्ली-एनसीआर हे एकमेव मोठे शहर आहे, जिथे ही घट झाली आहे. नाइट फ्रँक इंडियाच्या इंडिया रिअल इस्टेट - रेसिडेन्शियल अँड ऑफिस रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रिपोर्टनुसार, दोन ते पाच कोटी रुपयांच्या घरांच्या विक्रीत वार्षिक आधारावर ८५ टक्क्यांनी वाढ झाली, तर ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री ९ टक्क्यांनी कमी आहे. एकूण विक्रीत या परवडणाऱ्या वर्गाचा वाटा २५ टक्के होता. ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या घरांच्या विक्रीतही १० टक्क्यांनी घट झाली आहे.
रिपोर्टनुसार, २०२४ च्या उत्तरार्धात बंगळुरूमध्ये घरांच्या किमती सर्वाधिक १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याखालोखाल हैदराबाद (८ टक्के) आणि चेन्नई (७ टक्के) यांचा क्रमांक लागतो. मुंबईत ५ टक्के तर दिल्ली-एनसीआरमध्ये ६ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. ८२७७ रुपये प्रति चौरस फूट हा सर्वाधिक सरासरी दर मुंबईत होता. दिल्ली-एनसीआरमध्ये सरासरी किंमत ५०६६ रुपये प्रति चौरस फूट होती.
काय म्हणाले एक्सपर्ट?
"२०२० पासून निवासी बाजारपेठ झपाट्यानं सुधारली आहे आणि २०२४ मध्ये १२ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. ग्राहकांना आता चांगल्या सुविधा आणि उच्च दर्जाची जीवनशैली हवी असल्यानं प्रीमियम घरांची मागणी झपाट्यानं वाढत आहे. नव्या वर्षातही हा वेग कायम राहिल,' अशी प्रतिक्रिया नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी दिली.
२०१९ ते २०२४ या कालावधीत ५० लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीतील लाँचमध्ये १० टक्क्यांनी घट झाली आहे. हा बदल म्हणजे घर खरेदीदार आता चांगल्या सोयी-सुविधा आणि मोठ्या जागांकडे आकर्षित होत असल्याचे संकेत आहेत. २०२४ मध्ये सुरू झालेल्या एकूण प्रकल्पांमध्ये महागड्या घरांचा वाटा ५० टक्के होता, तर २०१९ मध्ये तो केवळ १६ टक्के होता.