Salary Hike Tips : सध्याच्या महागाईच्या काळात प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटतं की त्याचा पगार इतका वाढायला हवा की सर्व खर्च सहज भागतील आणि काही बचतही करता येईल. मात्र, अनेकांना महागाईनुसार पगारवाढ मिळत नाही, विशेषतः खाजगी क्षेत्रात ही एक सामान्य समस्या आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मते, देशातील महागाई दरवर्षी ६ ते ७ टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे, जर तुम्हाला महागाईशी दोन हात करत बचत करायची असेल, तर तुमची वार्षिक पगारवाढ यापेक्षा जास्त असायला हवी.
जर तुमचा पगार अपेक्षेनुसार वाढत नसेल, तर लगेच नोकरी सोडण्याचा विचार करण्याऐवजी खालील चार पर्याय नक्की विचारात घ्या. अनेकदा लोक कमी पगारवाढीसाठी कंपनीला किंवा बॉसला दोष देतात, पण काहीवेळा आपण स्वतःही याला जबाबदार असतो.
बॉसशी थेट बोला: तुमच्या कंपनीच्या पगारवाढीच्या धोरणांबद्दल माहिती घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पगार कमी आहे, तर तुमच्या बॉसशी थेट बोला. पण बोलण्यापूर्वी, तुमचा पगार का वाढवला जावा, यासाठी तुम्ही कंपनीसाठी काय महत्त्वपूर्ण काम केले आहे, याची ठोस माहिती तुमच्याकडे असायला हवी. तुम्ही कंपनीसाठी का महत्त्वाचे आहात, हे त्यांना पटवून द्या. वाटाघाटी करूनही लगेच पगारवाढ मिळाली नाही, तरी निराश होऊ नका. भविष्यात कधी पुन्हा यावर चर्चा करता येईल हे विचारा आणि तुमचे काम मन लावून करत रहा. इतर सहकाऱ्यांच्या पगाराशी कधीही तुलना करू नका.
कौशल्य विकास करा: तुमच्या सध्याच्या कामाची बाजारात किती मागणी आहे याचा विचार करा. जर तुमच्या क्षेत्राला फारशी मागणी नसेल किंवा त्यात करिअर वाढ दिसत नसेल, तर नवीन कौशल्ये शिका. डेटा विश्लेषण (Data Analytics), कोडिंग (Coding), डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने (AI Tools) कशी वापरायची हे शिकणे यात समाविष्ट असू शकते. नोकरीत असतानाच हे केल्यास, तुमचे काम पाहून बॉस प्रभावित होईल आणि कंपनी तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी उत्सुक राहील. यामुळे तुम्हाला इतर ठिकाणांहूनही चांगल्या संधी मिळू शकतात.
नोकरी बदलण्याचा विचार करा: जर अनेक वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत असाल आणि पगार महागाईनुसार वाढत नसेल, तर नोकरी बदलण्याचा विचार करा. नवीन कंपनीत नवीन भूमिका आणि काम करण्याची पद्धत बदलल्यामुळे तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. नोकरी बदलण्यापूर्वी, तुमच्या अनुभव, शिक्षण आणि भूमिकेनुसार नवीन संस्थेत तुम्हाला किती पगार मिळू शकतो, याचा अभ्यास करा. चांगली ऑफर मिळत असेल तर नोकरी बदलण्यात काहीच गैर नाही. अनेकदा लोक एकाच कंपनीत राहून पगाराशी तडजोड करतात आणि आपले आर्थिक नुकसान करून घेतात.
उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा : जर तुम्हाला लगेच नोकरी बदलता येत नसेल, तर सध्याच्या नोकरीसोबतच अर्धवेळ कमाईचा स्रोत निर्माण करा. यासाठी कंपनीच्या धोरणांची माहिती करून घ्या, जेणेकरून नंतर कोणतीही समस्या येणार नाही. तुम्ही फ्रीलान्सिंग (Freelancing), अर्धवेळ प्रकल्प करू शकता किंवा तुमच्या कुटुंबाच्या मदतीने एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकता. ग्राफिक डिझाइन, कंटेंट रायटिंग किंवा ट्युटोरिंगसारखी कौशल्ये तुम्हाला यात मदत करतील. याशिवाय, शेअर बाजाराच्या युक्त्या शिकून लहान गुंतवणुकीपासून सुरुवात करणे हा देखील आजच्या काळात एक चांगला पर्याय आहे, पण त्यासाठी आधी आर्थिक शिक्षण घ्या.
वाचा - एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
या चार पद्धतींचा अवलंब केल्यास तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नक्कीच प्रगती करू शकाल आणि महागाईचा सामना करत आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित राहाल.