Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या दबावाचा परिणाम; भारताची रशियन तेल आयात घटली, तुर्कीने मारली बाजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 21:07 IST

Russian Oil Import: रिलायन्स आणि सरकारी कंपन्यांनी केली कपात.

Russian Oil Import: रशियाकडूनभारतासह अनेक देश कच्च्या तेलाची आयात करतात. आतापर्यंत रशिकडील तेल खरेदीद भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, आता तुर्कीने भारताला मागे टाकत रशियन कच्च्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा आयातदार बनण्याचा मान मिळवला आहे. डिसेंबर 2025 मध्ये तुर्कीने रशियाकडून सुमारे 2.6 अब्ज युरोचे कच्चे तेल खरेदी केले.

तुर्कीच्या या खरेदीमुळे भारत रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीत दुसऱ्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. युरोपमधील संशोधन संस्था Center for Research on Energy and Clean Air (CREA) यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

भारताची आयात मोठ्या प्रमाणात घटली

CREA च्या अहवालानुसार, डिसेंबर 2025 मध्ये भारताने रशियाकडून एकूण 2.3 अब्ज युरोचे कच्चे तेल आयात केले. ही रक्कम नोव्हेंबरमधील 3.3 अब्ज युरोच्या तुलनेत तब्बल 1 अब्ज युरोने कमी आहे. भारताच्या एकूण खरेदीपैकी 78 टक्के हिस्सा कच्च्या तेलाचा होता, तर भारताने 42.4 कोटी युरोचा कोळसा आणि 8.2 कोटी युरोची तेल उत्पादनेही रशियाकडून आयात केली आहेत.

रिलायन्स व सरकारी रिफायनऱ्यांमुळे आयातीत कपात

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारताच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत मासिक आधारावर 29 टक्क्यांची घट झाली आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरीने डिसेंबरमध्ये रशियाकडून होणारी आयात निम्म्यावर आणली आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल रिफायनऱ्यांनीही याच कालावधीत रशियन आयातीत 15 टक्क्यांची कपात केली.

अमेरिकेच्या दबाव?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त शुल्क लादला आहे. याशिवाय, त्यांनी भारतीय कंपन्यांना रशियन तेल खरेदी न करण्याचा इशाराही दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारताच्या रशियन तेलाच्या आयातीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता आगामी काळात ही आयात वाढणार की आणखी कमी होणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. या आयातीवरच भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती ठरू शकतात.

चीन अजूनही सर्वात मोठा खरेदीदार

दरम्यान, चीन हा रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश राहिला आहे. रशियाच्या टॉप पाच आयातदारांकडून होणाऱ्या एकूण निर्यात उत्पन्नात चीनचा वाटा 48 टक्के (सुमारे 6 अब्ज युरो) इतका असल्याचे CREA च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रशिया अद्यापही जागतिक ऊर्जा बाजारात महत्त्वाचा पुरवठादार ठरत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

English
हिंदी सारांश
Web Title : US Pressure Impacts India; Russian Oil Imports Drop, Turkey Gains

Web Summary : US pressure led to India reducing Russian oil imports. Turkey is now the second-largest importer, surpassing India. China remains the top buyer. Reliance's refinery cut imports significantly.
टॅग्स :रशियाखनिज तेलभारतअमेरिका